By: school companion team
शांततेचे व समतेचे थोर उपासक म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी !आज आपण महात्मा गांधी निबंध मराठी (Essay On Mahatma Gandhi In Marathi) लिहिणार आहोत.
निबंध क्रमांक -1
महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित घरात झाला.त्यांचे वडील करमचंद त्याकाळी पोरबंदर संस्थानाचे दिवाण होते.त्यांच्या आजोबांचे नाव उत्तमचंद गांधी असे होते. महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा होते.महात्मा गांधी यांच्या आईचे नाव पुतळीबाई असे होते. त्या खूप धार्मिक होत्या.त्या आपल्या मुलांना ध्रुव, प्रल्हाद, हरिश्चंद्र, श्रावणबाळ यांच्या वेगवेगळ्या धार्मिक गोष्टी सांगत. आपले वागणे हे नैतिकदृष्ट्या योग्य असायला हवे असे त्या आपल्या मुलांना नेहमी सांगत असत. पुढे जाऊन महात्मा गांधी यांनी जो 'अहिंसेचा' पुरस्कार करून इंग्रजांना आपल्या देशातून निघून जायला भाग पाडले त्याचे मुळ त्यांच्यावर बालपणी झालेले हे संस्कारच असावेत हे नक्की !
महात्मा गांधी यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर या ठिकाणी झाले. त्यांनंतर त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण राजकोट येथे पूर्ण केले, तर मॅट्रिकची परीक्षा भावनगरमधील शामळदास कॉलेजमध्ये दिली.शालेय शिक्षण घेत असतांना त्यांच्या चांगल्या वर्तणुकीमुळे सर्वच प्रभावित होते. मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर घरच्यांच्या इच्छेनुसार वकिलीचा अभ्यास करण्यासाठी ते लंडनला रवाना झाले. तेथील युनिव्हर्सिटी कॉलेजमधे त्यांनी प्रवेश घेतला. भारतीय कायदा आणि न्याव्यस्थेचा अभ्यास त्यांनी याठिकाणी केला. यादरम्यान त्यांचे वास्तव्य इनर टेंपल या गावात होते. कायद्याचा अभ्यास करत असताना त्यांना धर्म, चाली, रीती, परंपरा, स्वातंत्र्य, पारतंत्र्य इत्यादी गोष्टींचा नव्याने उलगडा झाला. बॅरिस्टर झाल्यानंतर ते 1891 साली भारतात परत आले व वकिलीचा व्यवसाय करू लागले.
थोड्याच दिवसांनी ते दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले. या ठिकाणी ते बॅरिस्टर म्हणून नोकरी करू लागले. या ठिकाणी महात्मा गांधींच्या जीवनात अनेक चढ-उतार आले. त्यांना अनेकदा अपमान सहन करावा लागला.परंतु त्यांनी आपले संतुलन कधीही ढळू दिले नाही. एकदा ते रेल्वेने प्रिटोरियाला जाण्यासाठी प्रवास करत होते. त्यांच्याकडे प्रथम वर्गाचे तिकिटही होते. मात्र श्वेतवर्णीय तिकीट तपासणीसाने त्यांना या डब्यात बसण्यास मज्जाव केला.त्यांना मालवाहतुकीसाठी जोडलेल्या डब्यात जाण्यास सांगितले. महात्मा गांधींनी नकार दिला असता, पीटरमारीत्झबर्ग स्टेशन आल्यावर अधिकाऱ्याने त्यांना फलाटावर ढकलून दिले. त्यांचे सामानही खाली फेकून दिले. ती रात्र महात्मा गांधींनी तिथेच जागून काढली. ते स्वतः त्याचवेळी त्या अधिकाऱ्याला प्रत्युत्तर देऊ शकत होते मात्र त्यांनी तो मार्ग निवडला नाही. त्यांनी अहिंसा व शांततेच्या मार्गावर चालणे पसंद केले. या घटनेने त्यांच्या मनावर मोठा परिणाम केला. त्यांनी वर्णद्वेषाविरुद्ध लढा देण्याचे निश्चित केले. हळूहळू त्यांनी ही गोष्ट कशी चूक आहे, कशी अन्यायकारक आहे, हे लोकांच्या लक्षात आणून द्यायला सुरुवात केली. वर्णद्वेषाविरुद्ध जनमत तयार केले. संघटित लढा देऊन जनजागृती घडवून आणली.
दक्षिण आफ्रिकेत सुमारे 21 वर्षे वास्तव्य केल्यानंतर सन 1915 साली महात्मा गांधी कायमस्वरूपी पुन्हा भारतात आले. आता त्यांची ओळख एक भारतीय राष्ट्रवादी, कुशल संघटक, शांती आणि अहिंसेचे प्रणेते अशी होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सहभागी होऊन त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. त्यांनी अनेक सभा घेतल्या. स्वातंत्र्याचे महत्व लोकांना पटवून दिले.सुरुवातीच्या काळात त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांचे मार्गदर्शन लाभले.
चंपारण व खेडा सत्याग्रह ! भारतात आल्यानंतर महात्मा गांधींच्या कामाला खरी सुरुवात या सत्याग्रहापासून झाली असे म्हणावे लागेल.बिहार मधील चंपारण व गुजरातमधील खेडा या दोन्ही ठिकाणी ब्रिटिश सत्ताधारी लोकांवर अन्याय करत होते. चंपारणमध्ये जमीनदार लोकांना निळीचे उत्पन्न घेण्यासाठी बळजबरी करत होते शिवाय भावसुद्धा कमी देत असत. दुष्काळ असतांनाही विविध कर लोकांकडून वसूल केले जात असत. अशीच काहीशी परिस्थिती खेडामध्येही होती.तिथेही इंग्रजांच्या जुलमी राजवटीमुळे लोकं त्रस्त झाली होती. सगळीकडे दारिद्र्य, रोगराई,अज्ञानी शेतकरी अशी अवस्था होती. महात्मा गांधींनी या दोन्ही ठिकाणचा अभ्यास केला. खेडात त्यांनी आश्रम उभा केला. आश्रमात जाऊन अनेक अनुयायी गोळा केले. सर्व माहिती गोळा केली. माहितीचे विश्लेषण केले. शाळा उभारल्या. ठिकठिकाणी दवाखान्याची सोय करण्यात आली. मात्र थोड्याच दिवसांनी इंग्रज सरकाने 'प्रदेशात अशांतता निर्माण' करण्याच्या आरोपाखाली महात्मा गांधींना अटक केली. या अटकेनंतर वेगळेच चित्र पाहायला मिळाले. हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. त्यांनी या अटकेचा निषेध केला. पोलीस स्टेशन,न्यायालय इत्यादी ठिकणी मोर्चे नेले. न्यायालयाने जनतेचा तीव्र संताप बघून त्यांची सुटका केली. महात्मा गांधींनी जमीनदारविरुद्ध संघटित जनआंदोलन उभे केले. जमीनदारांना माघार घ्यायला लावली. ब्रिटिशांच्या अंमलाखाली जमीनदारांनी एक ठराव मंजूर केला. या ठरावानुसार शेतकऱ्यांना पीक घेण्याची मुभा देण्यात आली. पिकासाठी योग्य मोबदला द्यायचे ठरले. तसेच दुष्काळ असेल करमाफी देण्याचं मान्य केेले. या आंदोलनानंतर महात्मा गांधींची ख्याती भारतभर पसरली.
भारताच्या स्वातंत्र्यलढयात महात्मा गांधींनी सुरू केलेल्या 'असहकार आंदोलनाचे' अनन्यसाधारण महत्व आहे. महात्मा गांधींनी अहिंसा, शांती यांच्याबरोबरच असहकाराचा प्रमुख शस्र म्हणून वापर केला. इंग्रजांच्या वस्तू न वापरणे, शैक्षणिक संस्थेत प्रवेश न घेणे, इंग्रजांनी दिलेल्या पदव्या परत करणे, खादीचा वापर करणे इत्यादी गोष्टींचा समावेश या असहकार आंदोलनात होता. हे आंदोलन इतके यशस्वी होत आहे हे बघून चौरी चौरा घटनेनंतर इंग्रजांनी त्यांना राजद्रोहाचा आरोपाखाली अटक केली.
पुढे, 1930 साली महात्मा गांधींनी इंग्रज सरकारविरुद्ध मिठावर लावत असलेल्या कराच्या विरोधात सत्याग्रह आंदोलनाची घोषणा केली. महात्मा गांधींनी इंग्रज सरकारला आव्हान देत,मीठ उचलण्यासाठी दांडी यात्रा काढली. या यात्रेत हजारो लोकं सामील झाली. इंग्रज सरकारसाठी हा मोठा इशाराच होता. इंग्रजांची व्यवस्था आता डळमळू लागल्याचे हे द्योतक होते. 1930 सालीच टाइम मासिकाने त्यांना 'द मॅन ऑफ द इयर' हा पुरस्कार देऊन गौरव केला. महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र ' माझे सत्याचे प्रयोग' आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
1939 साली दुसरे महायुद्ध सुरू झाले. महात्मा गांधींनी ही संधी बरोबर ओळखली. त्यांनी आंदोलन अधिक कडक केले. मागण्यांचा जोर लावून धरला. त्यांनी भारतीय काँग्रेस पक्षात ठराव मांडला. या ठरावानुसार इंग्रजांना भारत सोडून जाण्यासाठी ठणकावण्यात आले. हेच ते 'भारत छोडो आंदोलन' ! भारतीय स्वातंत्र्याची लढाई अगदी शेवटच्या टप्प्यावर आली होती !
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. महात्मा गांधींच्या अथक प्रयत्नांची, कठोर मेहनतीची, अनेक क्रांतिकारकांच्या त्यागाची फलनिष्पत्ती म्हणजे स्वातंत्र्य होय.30 जानेवारी 1948 या दिवशी दिल्लीमधील बिर्ला भवन बागेत महात्मा गांधी फिरत असताना नथुराम गोडसे या माथेफिरुने बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या केली.आणि अशाप्रकारे एका महान नेत्याचा शेवट झाला.
महात्मा गांधींनी आपले अवघे जीवनच देशासाठी वेचले आहे. आणि म्हणूनच रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना 'महात्मा' असे संबोधले. तर सुभाषचंद्र बोस यांनी त्यांचा उल्लेख 'राष्ट्रपिता' म्हणून केला. त्यांची देशभक्ती, त्यांचे स्वातंत्र्यासाठीचे अथक प्रयत्न, त्यांचा देशासाठीचा त्याग शब्दांत वर्णीने केवळ अशक्य आहे. आणि म्हणूनच अवघ्या देशानेच नव्हे तर जगानेही त्यांना 'महात्मा' म्हणून स्वीकारले.
हे ही वाचा :
मित्रांनो,महात्मा गांधी यांच्या जीवनावरील निबंध तुम्हांला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच कोणत्या विषयावरील निबंध तुम्हांला वाचायला आवडेल हेही सांगा.
0 Comments