Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शाहू महाराज मराठी निबंध | Chhatrapati Shahu Maharaj Marathi Nibandh |

                  By: school companion team


शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :



 







-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

छत्रपती शाहू महाराज मराठी निबंध




'महाराजांचे महाराज' अशी ज्यांची ओळख आहे, अशा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कागल येथे जहागिरदार श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या घराण्यात 26 जून 1874 रोजी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. शाहू महाराजांचे लहानपणीचे नाव यशवंतराव असे होते. कोल्हापूर संस्थानातील राजे 'चौथे शिवाजी' यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विधवा पत्नी महाराणी आनंदीबाई यांनी आपल्या संस्थानातील जहागीरदार जयसिंगरावांच्या मुलाला यशवंतरावला दत्तक घेतले. आणि मुलाचे नवीन नाव ठेवले - शाहू !

राजकोट आणि धारवाड येथे संस्थानिकांच्या मुलांसाठी असलेल्या विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. शिक्षण घेत असताना त्यांना फ्रेझर नावाचे गुरू भेटले. फ्रेझर यांच्या शिक्षणपद्धतीमुळे शाहू महाराजांच्या जीवनावर खूप जास्त प्रभाव पडला असे म्हटले जाते.


2 एप्रिल 1894 रोजी संस्थानाचे प्रशासकीय अधिकार शाहू महाराजांना प्राप्त झाले. हा दिवस भारतीय इतिहासातील महत्वाचा दिवस ठरला आहे. देशातील अवघे जीवनमान ढवळून काढणाऱ्या,सामाजिक सुधारणेसाठी आग्रही असणाऱ्या एका लोककल्याणकारी राजाची कारकीर्द या दिवसापासून सुरू झाली होती.


स्वातंत्र्याच्याही पूर्वीच्या काळात शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्व जाणले. माणसांच्या दारिद्र्याचे मूळ कारण शिक्षण हेच आहे, असे महाराज म्हणत असत. आणि म्हणूनच प्राथमिक शिक्षणावर त्यांनी विशेष भर दिला. 1917 साली त्यांनी 'सक्तीच्या आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा' केला. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाहीत त्यांना महिन्याला 1 रुपया दंड ठेवला. विशेष म्हणजे कौशल्यावर आधारित शिक्षण मुलांना देण्यास सुरुवात केली. ज्याला जि कला आवडेल, त्याने त्यात प्राविण्य मिळावे असे ते शिक्षण होते. जे हुशार विद्यार्थी असत त्यांच्या पुढील सर्व शिक्षणाची जबाबदारी संस्थानाकडून पार पाडली जात असे.


शाहू महाराजांनी जातीभेद नष्ट करण्यासाठीही अथक प्रयत्न केले. त्यांनी आपल्या संस्थानात 1919 साली अस्पृश्य व सवर्णांच्या वेगवेगळ्या शाळा भरण्याची पद्धत बंद केली.हा त्याकाळी घेतलेला मोठा निर्णय होता.त्यांच्यावर मोठी टीकाही झाली. मात्र महाराजांनी माघार घेतली नाही. अस्पृश्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुद्धा शाहू महाराजांनी प्रयत्न केले. त्यांना वेगवेगळे छोटे-मोठे उद्योगधंदे टाकून दिले. अस्पृश्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना व्यवसायचे शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र शाळा उभारल्या. शिकलेल्या अस्पृश्य मुलांना नोकऱ्या दिल्यामागासलेल्या लोकांना शासकीय नोकरीत 50 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.आपल्या संस्थानात त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली. अशाप्रकारे जातीभेद नष्ट करण्यासाठी जे जे शक्य होते, ते त्यांनी केले.


शाहू महाराजांना आपल्या कार्यकाळात दुष्काळ आणि भयंकर प्लेगच्या साथीलाही तोंड द्यावे लागले. मात्र, ते या सर्व संकटांना पुरून उरले. दुष्काळाच्या काळात त्यांना लोकांना कामे उपलब्ध करून दिली. स्वस्त धान्याची दुकाने स्थापन केली.
समाजातील एकाकी लोकांना  मदत म्हणून त्यांनी 'निराधार आश्रमाची' स्थापना केली. संकटातही खंबीरपणे काम करणारा राजा अशी शाहू महाराजांची ख्याती होती.


 

शाहू महाराजांनी कुलकर्णी वतने नष्ट केली आणि त्याऐवजी 'तलाठी' पद तयार केले.बलुते पध्दत नष्ट केली.गुन्हेगारांना सगळीकडेच अपमानास्पद वागणूक मिळते, मात्र शाहू महाराजांनी गुन्हेगारांनाही चांगली वागणूक दिली. पूर्वाश्रमी अनेक लहान-सहान गुन्हे करणाऱ्यांना माफ केले. त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले. त्यांना उद्योगधंदे टाकून दिले.


शाहू महाराजांना कलेविषयी, कलाकारांविषयी आपुलकी होती. ते स्वतः रसिक होते. त्यामुळेच त्यांनी अनेक कलाकारांना राजाश्रय दिला. चित्रपट, संगीत, कुस्ती, चित्रकला, अशा वेगवेगळ्या कलांना त्यांनी प्रोत्साहन दिले. प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील, बालगंधर्व, भालजी पेंढारकर, बाबूराव पेंटर अशा अनेक कलाकारांना शाहू महाराजांनी राजाश्रय दिला. त्यांना सर्वोत्तपरी मदत केली. शाहू महाराजांच्या मदतीमुळे या कलाकारांना आपली कला निर्विवादपणे जोपासता आली. कलाकारांना झोकून काम करता आले.


शाहू महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले.समाजात समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता स्थापित करण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले.त्यांचे हे अफाट काम पाहून कानपूरच्या क्षत्रिय कुर्मी समाजाने त्यांना 'रानश्री' ही पदवी बहाल केली. आजही, महाराष्ट्राची ओळख सांगताना 'शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र' अशी सांगतात. अशा या लोककल्याणकारी राजाचा मृत्यु अकालीच, वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी मुंबई येथे दिनांक 6 मे 1922 साली झाला. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर अवघ्या देशाच्या जडणघडणीत अतिशय महत्त्वाची भूमिका असणाऱ्या 'राजश्री शाहू महाराजांना' विनम्र अभिवादन.

हे ही वाचा : जागतिक योग दिन | आंतरराष्ट्रीय योग दिन | international yoga day 21 june | पुस्तक वाचा |


हे ही वाचा : माझी उन्हाळ्याची सुट्टी मराठी निबंध | mazi unhalyachi sutti marathi nibandh | my summer vacation essay |


याबाबतच्या अधिक माहितीसाठी,नोकरी व रोजगाराच्या संधी, दररोजचे वृत्तपत्र, शैक्षणीक घडामोडी, शिष्यवृत्ती सराव, स्पर्धा परीक्षा इत्यादींबाबत जाणून घेण्यासाठी व्हॉट्सॲप समूहात सामील व्हा..



Post a Comment

0 Comments