Ticker

6/recent/ticker-posts

15 ऑगस्ट मराठी भाषण | 15 august speech in marathi | independence day speech in marathi |

                   By: school companion team

शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :



                   
15 ऑगस्ट मराठी भाषण

15 ऑगस्ट भाषण क्र. 01 (क्रांती )


अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो,आज मी तुम्हांला 15 ऑगस्ट बद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती.

मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्याअगोदर सुमारे दिडशे वर्षांपूर्वी इंग्रज भारतात आले होते. व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशात पाय ठेवला. आणि नंतर कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला. अवघ्या देशभरात आपले साम्राज्य उभारले. त्यानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीत आपण दीडशे वर्ष भरडत राहिलो. याकाळात इंग्रजांनी येथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले.


मित्रांनो, पारतंत्र्यात किती दिवस जगायचे ? इंग्रजांचे गुलाम म्हणून जगताना किती दिवस अत्याचार सहन करायचा ? आपल्याच देशात परके म्हणून किती दिवस वावरायचे ? जिथे सोने उगवले जाते त्या आपल्या देशाची संपत्ती उघड्या डोळ्यांसमोर लुटली जात असताना किती दिवस शांत राहायचे ? असा प्रश्न भारतमातेच्या लेकरांना पडला नसता तरच नवल !


ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढण्यासाठी भारतभूची लेकरं तयार झाली.इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. इंग्रजांची जुलमी सत्ता उलथवून टाकण्याची शपथ त्यांनी घेतली. आपल्या देशात इंग्रज नव्हे तर आपलीच जनता राज्य करणार अशी मोठी क्रांती करण्याचा निर्णय भारतमातेच्या या क्रांतिकारकांनी घेतला.


अशक्य कोटीतील लक्ष्य होते ! पण, नेताजी सुभाषचंद्र बोस,विनायक दामोदर सावरकर, मदनलाल धिंग्रा,खुदिराम बोस, चाफेकर बंधू यांसारख्या क्रांतिकारकांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे अशक्य अशी कोणती गोष्ट नव्हतीच मुळी ! या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचा ठरवला. सामर्थ्यवान इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली. हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढयात भाग घेतला. अनेक क्रांतिकारकांना इंग्रजांनी फासावर लटकावले. भारतमातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी क्रांतिकारक हसत हसत फासावर गेले.महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या नेत्यांनीही स्वातंत्र्यांच्या लढयात उडी घेतली.चारही बाजुंनी इंग्रजांना घेरण्यात आले. आणि शेवटी तो सुवर्णदिन आला ! 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. सुमारे दीडशे वर्षाची जुलमी राजवट उलथवून टाकण्यात भारतीय यशस्वी झाले होते. दीडशे वर्ष या भारतभूमीवर फडकणारा 'युनियन जॅक' खाली घेण्यात आला आणि 'तिरंगा' अभिमानाने फडकवण्यात आला.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो प्रखर राष्ट्रभक्तांनी, क्रांतिकारकांनी, नेत्यांनी आपले बलिदान दिले, त्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम करतो व मी माझे भाषण संपवतो.                जय हिंद, जय भारत !


15 ऑगस्ट भाषण क्र. 02 (अमृत महोत्सवानिमित्त)

अध्यक्ष महोदय, सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो,आज मी तुम्हांला आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती.

मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आज 15 ऑगस्ट 2022. आज, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज देशभरात आपल्या देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य सोहळा साजरा होत आहे. अवघा देश जल्लोषात न्हावून निघाला आहे. या अभूतपूर्व सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार ठरले आहोत, हे आपले मोठे भाग्यच !

मित्रांनो, दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत, लाल किल्ल्यापासून ते गाव, खेड्यांपर्यंत आज सगळीकडे एकच घोषणा दुमदुमत आहे - भारत माता की जय ! देशभर आनंदाची लहर पसरली आहे. आज प्रत्येक भारतीयासाठी मोठा आनंदाचा दिवस आहे. साडेसात दशकाचं स्वातंत्र्य आपण सर्वांनी उपभोगलं आहे.त्या अगोदर दिडशेहून जास्त वर्ष आपला देश पारतंत्र्यात होता.या दोन्ही टप्प्यांचा लेखाजोखा मांडला तर आपल्या हाती काय लागते ? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाने सर्वच क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी केली आहे. स्वातंत्र्याचा 75 वर्षांचा काळ आता इतिहास झाला आहे. या काळाचे 'नव्या भारताच्या उभारणीचा काळ' असेच वर्णन करावे लागेल. या काळात भारताने कृषी, औद्योगिक, तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. अवघ्या जगाला कवेत घेण्याची आमची क्षमता आहे हे या काळात भारताने दाखवून दिले.याच काळात आपल्या देशाने साऱ्या विश्वाचे नेतृत्व करण्याची क्षमता कमावाली. आपल्या सर्वसमावेशक संस्कृतीचा उद्घोष केला.सर्वांगीन विकासाचे प्रारूप आपल्या देशाने तयार केले. अवघ्या जगाला एकात्मतेची शिकवण दिली. ही प्रगती होत असताना भारताची 'व्यापक सांस्कृतिक पार्श्वभूमी' महत्वपूर्ण ठरली. त्यामुळेच आपला देश आकाशात उंच भरारी मारत असताना पाय मात्र जमिनीवर ठेवू शकला. 

मित्रांनो, हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या आहुतीने आपल्याला 75 वर्षांपूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आजच्या क्षणी त्या महान क्रांतिकारकांचे स्मरण प्रत्येक देशवासीयांनी करायला हवे. त्यांनी शिकवलेली त्यागाची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांच्या खांद्यावर आहे. आपल्या देशाचा तिरंगा उंचच उंच फडकत राहण्यासाठी कितीही अडचणी आल्या, कितीही संकटे आले तरी आपण डगमगता कामा नये. 

अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला ! हेच आपले जीवनगाणे असायला हवे...             जय हिंद जय महाराष्ट्र !

15 ऑगस्ट भाषण क्र. 03 (स्वातंत्र्य संग्राम)

आदरणीय विचारमंच, विचारमंचावरील अध्यक्ष महोदय,  गावातील प्रतिष्ठित मंडळी, पूज्य गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्रांनो, आज मी तुम्हाला आपल्या स्वातंत्र्य दिनाबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही नम्रपणे ऐकून घ्याल अशी नम्र विनंती करतो.

मित्रांनो, सुमारे दीडशे वर्ष इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केले. इंग्रजांनी आपल्या देशातील नागरिकांना गुलाम म्हणून वागवले. आणि शेवटी तो सुवर्ण दिवस उगवला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला.

मित्रांनो, १८५७ चा स्वातंत्र्यसंग्रामांच्या उठावातच स्वातंत्र्याचे पाळेमुळे रुजली होती. झाशीची राणी, तात्या टोपे इ. वीरांच्या प्रेरणेने झालेले प्रथम स्वातंत्र्ययुध्द आज स्मरणीय आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच पुढे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी ही परंपरा पुढे सुरु ठेवली, त्यानंतर लाल, बाल, पाल, आणि नेहरु, गांधीजींच्या अहिंसा तत्वाने, असहकार चळवळींनी इंग्रजाशी सामना केला.

वि. दा. सावरकर, मदनलाल धिंग्रा, खुदीराम बोस, कान्हेरे, चाफेकर बंधू या स्वातंत्र्य वीरांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. काही देशभक्त हसतहसत फासावर चढले. त्यांनी वीरमरण पत्करले आणि इंग्रज सरकारने चालविलेल्या दडपशाही, जुलमी कायदे यांचा प्रतिकार करण्याची जनतेला हाक दिली. १९४२ च्या 'चलेजाव' च्या लढ्यात आंदोलनाचे पुढे उग्ररुप धारण केले. नेताजी सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेनेही अभूतपूर्व कार्य केले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य प्राप्ती झाली आणि जवळजवळ १५० वर्ष हिंदुस्थानवर फडकणारे 'युनियन जॅक' ऐवजी 'तिरंगा' ध्वन डोलाने फडकविला गेला.

स्वातंत्र्यासाठी बलिदान करण्याऱ्या त्या हजारो ज्ञात-अज्ञात क्रांतिवीरांचा आदर्श, त्याग, सेवा व प्रखर राष्ट्रप्रेम स्वजीवनात आणले जाईल, तेव्हाच राष्ट्राचे परिवर्तन म्हणजे खऱ्या अर्थाने स्वराज्यावे सुराज्य होईल.

जय हिंद जय महाराष्ट्र. 

15 ऑगस्ट भाषण क्र. 04 (राष्ट्रीय ध्वज)


अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो आज 15 ऑगस्ट. आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन ! आजचा दिवस सर्वच भारतीयांसाठी मोठ्या आनंदाचा दिवस असतो. आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तुम्हांला आपल्या राष्ट्रध्वजाविषयी चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत पणे एकूण घ्यावेत ही नम्र विनंती.

बालमित्रांनो,आपल्या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगी आहे. म्हणजेच त्यामध्ये तीन रंग आहेत. सर्वात वरच्या बाजूला केशरी, मध्यभागी पांढरा व सर्वात खाली हिरवा रंग आहे.

मध्यभागी पांढऱ्या रंगामध्ये निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे. चक्रात 24 आरे आहेत.सर्वात वरचा केशरी रंग त्यागाचा प्रतीक आहे. मध्यभागी असलेला पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे तर सर्वात खाली असलेला हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे.

राष्ट्रीय ध्वज आपला अभिमान आहे. आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे.एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र!

15 ऑगस्ट भाषण क्र. 05 (महात्मा गांधी)

     अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हाला महात्मा गांधींजी विषयी दोन - चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.....

     महात्मा गांधीजींचा जन्म गुजरात राज्यातील पोरबंदर या ठिकाणी 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते.त्यांनी भारतीयांना इंग्रजांच्या अन्यायी, अत्याचारी, जुलमी सत्तेतून रक्ताचा एक थेंबही न सांडता सत्याग्रहाच्या व  उपोषणाच्या मार्गाने मुक्त करून जगाला एक नवा क्रांतीचा मार्ग दाखवून दिला.

       त्यांनी परदेशात जाऊन वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते नोकरी निमित्त बाहेर पडले. त्यांना इंग्रजांच्या अन्यायी जुलमी सत्तेची प्रचंड चीड आली. परकीय सत्तेला देशातून हाकलून देण्यासाठी सत्य, अहिंसा, असहकार, सत्याग्रह व स्वदेशीचा वापर, उपोषण व हरताळ या सूत्रांनुसार त्यांनी इंग्रजांना देश सोडण्यास भाग पाडले.                                 

         'चले जाव' चळवळ, दांडी यात्रा, आमरण उपोषण अशा विधायक मार्गांचा वापर करून हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा या थोर राष्ट्रपित्याने अस्पृश्यांना समानतेची वागणूक मिळावी म्हणून मानवतेची शिकवण देशवासीयांना दिली.  शांततेचे व समतेचे ते थोर उपासक होते. त्यांना राष्ट्रपिता म्हणूनही संबोधले जाते.शांततेच्या मार्गाने लढा देणारा थोर महापुरुष आपल्या देशाला लाभला हे आपणा सर्वांचे परम भाग्य होय. 30 जानेवारी 1984 रोजी या महान नेत्याने जगाचा निरोप घेतला. त्यांना कोटी कोटी प्रणाम करून मी माझे भाषण संपवतो..

जय हिंद, जय भारत.धन्यवाद!

15 ऑगस्ट भाषण क्र. 06 (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)

आदरणीय व्यासपीठ, येथे जमलेले ग्रामस्थ आणि माझ्या बंधु भगिनींनो आज मी तुम्हाला 15ऑगस्ट बद्दल अशा एका महामानवाबद्दल माहिती सांगणार आहे, ज्याने आपले संपूर्ण आयुष्य मानव जातीतील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी घालवले. भारताच्या राज्यघटनेत अस्पृश्यतेला थारा नाही. अस्पृश्यता समूळ नष्ट करण्यासाठी  व दलितांच्या उद्धारासाठी अविरत धडपडणाऱ्या , झुंजार व्यक्तिमत्त्व असलेल्या महापुरुषाचे नाव होते- डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 

होय, तेच ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार.त्यांचे पूर्ण नाव- भीमराव रामजी आंबेडकर असे होते.त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891मध्ये इंदोर मधील महू या गावी झाला.ते लहान पणापासूनच हुशार, बुद्धिमान होते. पदवीनंतर उच्च शिक्षणासाठी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्याकडे शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज करून अमेरिकेला गेले.              पुढे शाहू महाराजांच्या आर्थिक साहाय्याने लंडनला जाऊन बॅरिस्टर झाले. 

त्यानंतर प्रॅक्टिसच्या निमित्ताने त्यांचा समाजाशी घनिष्ठ संबंध आला ,व त्यातून त्यांना जातीयतेच्या भेदाभावाच्या रुक्ष कडा उठून दिसू लागल्या.हरिजनांच्या उद्धरासाठी व अस्पृश्यतेच्या समूळ उच्चाटणासाठी त्यांनी अविरत कष्ट घेतले. महाड येथील तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन अशा प्रकारे असमानतेचा निषेध केला. मानवतेच्या हक्कासाठी, सर्व सामन्याच्या शिक्षणासाठी अनेक उपक्रम राबविले. अशा या महान दलितउद्धारकानेच भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितिचे पवित्र काम उत्तम प्रकारे पार पाडले. त्यांना 'भारतरत्न' किताबाने सन्मानित करण्यात आले.   

अशा या महामानवाचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 साली झाला. त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र...

भाषण क्र. 07 

आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हाला आपल्या भारताच्या स्वातंत्र्याची थोडक्यात माहिती सांगणार आहे. तरी ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावी ही नम्र विनंती....

आज 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र दिन साजरा होत आहे..इंग्रजांनी व्यापाराच्या निमित्ताने येऊन आपले साम्राज्य भारतात उभारले. त्यामुळे त्यांच्या गुलामगिरीत आपल्याला दीडशे वर्षे भरडत राहावे लागले...

1857 चा स्वातंत्र्यसंग्रामाच्या उठावात स्वातंत्र्याचे पाळेमुळे रुजली होती...झाशीची राणी लक्ष्मीबाई, त्यांचे गुरु तात्या टोपे या सारख्या वीरांच्या प्रेरणेने झालेले पहिले स्वातंत्र्य युद्ध आजही स्मरणात आहे. त्यांच्याच प्रेरणेतून पुढे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी ही परंपरा कायम ठेवली. आणि त्यानंतर पुढे लाल, बाल, पाल, नेहरू, गांधीजी अहिंसा तत्त्वाने, असहकार चळवळीने इंग्रजाशी सामना केला..त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. 

या सर्वाना माझा कोटी कोटी प्रणाम,एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो ....धन्यवाद....

जय हिंद जय भारत....


 


 (आणखी भाषणे लवकरच अपडेट केले जातील. वाचण्यासाठी आपण या पोस्टखालील Follow या बटनावर क्लिक करा. )

याबाबतच्या अधिक माहितीसाठी,नोकरी व रोजगाराच्या संधी, दररोजचे वृत्तपत्र, शैक्षणीक घडामोडी, शिष्यवृत्ती सराव, स्पर्धा परीक्षा इत्यादींबाबत जाणून घेण्यासाठी व्हॉट्सॲप समूहात सामील व्हा..



 


Post a Comment

0 Comments