Ticker

6/recent/ticker-posts

गोपाळकाला मराठी माहिती | गोपाळकाला निबंध मराठी | essay on gopalkala in marathi |

                By: school companion team

शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :


गोपाळकाला मराठी माहिती


निबंध : 

कंसाच्या बंदिशाळेत श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला वसुदेव व देवकी यांच्या पोटी श्रीकृष्णचा जन्म झाला. श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीला गोकुळात झाला म्हणून या दिवसाला 'गोकुळाष्टमी' असेही म्हणतात. अष्टमीला मध्यरात्री झालेल्या कृष्णजन्माच्या आनंदप्रित्यर्थ दुसऱ्या दिवशी म्हणजेच श्रावण वद्य नवमीला गोपाळकाल्याचा उत्सव साजरा केला जातो.

श्रीकृष्ण गोकुळात लहानाचे मोठे झाले. गोकुळात असताना ते आपल्या संवगड्यासह रानात गायी चारायला घेऊन जात असत. रानात जाताना ते सर्वजण दुपारच्या जेवणासाठी आपापल्या शिदोऱ्या सोबत घेऊन जात असत. दुपारी भूक लागल्यावर श्रीकृष्ण आणि सवंगडी  एकत्रित जेवायला बसत असत.श्रीकृष्ण स्वतः सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित करायचे म्हणजेच काला करायचे आणि सर्वांना वाटायचे. 'गोपाल' म्हणजे गायींचे पालन करणारे. 'काला' म्हणजे एकत्र मिसळणे. पोहे, दही, ताक, ज्वारीच्या लाह्या, आंब्याचे लोणचे, चण्याची डाळ, साखर, वेगवेगळ्या फळांच्या फोडी, इत्यादी गोष्टी एकत्रित करून जो पदार्थ तयार होतो, त्याला काला असे म्हणतात. हा 'काला' श्रीकृष्णाला खूप आवडायचा असे म्हटले जाते. 

 गोकुळात सर्वांचा दूध, दही ताक करून विकण्याचा व्यवसाय होता. सर्वजण या गोष्टी मथुरेत विकायला घेऊन जात असत.श्रीकृष्णाला मात्र हे मान्य नव्हते. दूध, दही ताक, लोणी, हे सर्व आपल्या संवगड्यांना मिळावे, ते सर्व धष्टपुष्ट व्हावेत अशी त्यांची इच्छा होती. श्रीकृष्णाला स्वतःलाही दूध, दही, ताक, लोणी प्रिय होते. म्हणूनच ते आणि त्यांचे मित्र शिंकाळ्यावरचे दूध, दही चोरून खात असत अशी आख्यायिका आहे. 

संपूर्ण भारतभर गोपाळकाल्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.यानिमित्ताने दहीहंडी फोडण्याचा खेळ घेतला जातो.एक मातीचे मडके घेतले जाते. रंग देऊन, फुलांचे हार घालून हे मडके छान सजवतात. त्यामध्ये दूध, दही, लाह्या, साखर, फळांचे तुकडे टाकून 'काला' तयार केला जातो. मग दोरीच्या साह्याने हे मडके उंचावर बांधले जाते. त्यानंतर वेगवेगळे 'गोविंदा' मंडळे त्या ठिकाणी येतात. गोविंदा म्हणजे जणू श्रीकृष्ण आणि त्यांचे संवगडीच !  उंचच उंच मनोरे (थर) लावून वर बांधलेली दहीहंडी फोडण्याचा ते प्रयत्न करतात. यशस्वी प्रयत्न करणाऱ्या गोविंदामंडळाला बक्षिस दिले जाते. दहीहंडीतील काला सर्वजण 'प्रसाद' म्हणून खातात. हंडीचे खापर सुद्धा 'सुख-समृद्धीसाठी'  घरात जपून ठेवण्याची प्रथा आहे. 

महाराष्ट्रात गोपाळकाल्याचा उत्साह व जल्लोष अवर्णनीय असतो. यानिमित्ताने दीपधारणा, पालखी, कृष्णलीलेचे विविध खेळ,भजन, नृत्य, गायन इ.कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्रीकृष्णाने आपल्या आचरणात गरीब-श्रीमंत, श्रेष्ठ-कनिष्ठ, उच्च-नीच, या भावनेला केव्हाही थारा दिला नाही. सहभोजनाच्या माध्यमातून सामाजिक समरसतेचे, एकात्मतेचे सूत्र पाच हजार वर्षांपूर्वी साकार केले. एकात्मतेचा हाच धागा, विचार, आजही आपण साजरा करत असलेल्या गोपाळकाल्यातून प्रत्यक्षात येतो.

श्रीकृष्णाने प्रजेचा अनन्वित छळ करणाऱ्या कंसाचा वध केला. कालिया, शिशुपाल अशा उन्मत्त प्रवृत्तीचा नाश केला.समाजजीवनात शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित केली. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी गीतेच्या स्वरूपात दिव्य संदेश दिला.

श्रीकृष्ण व्यवहार कुशल होता. श्रीकृष्णाने दुर्जनांना धडा शिकवला व सज्जनांचा कैवार घेतला.म्हणूनच श्रीकृष्णाला 'धर्मसंस्थापक' असेही म्हटले जाते.आणि म्हणूनच गोपाळकाला या सणाला भारतीय संस्कृतीत  अनन्यसाधारण महत्व आहे.

छोटे भाषण :

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो....! आज श्री. कृष्ण जयंती निमित्त मी आपणांस जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती..

श्री कृष्ण जयंती म्हणजे कृष्णाचा जन्मदिवस. श्री कृष्णाला वासुदेव, देवकी नंदन, यशोदेचा कान्हा, राधेचा श्याम अशा अनेक नावानी संबोधतात.श्री कृष्णला रामाचा अवतार आहे असे म्हणतात.

श्री कृष्णाचा जन्म अष्टमीला गोकुळात झाला म्हणून या दिवसाला 'गोकुळाष्टमी' म्हणतात. कृष्णाचा जन्म हा अष्टमीच्या मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात कंसाच्या बंदिवासात झाला. कृष्णजन्माष्टमी सर्व लोक भक्तीभावाने साजरी करतात. या दिवशी लोक उपवास करतात व मध्यरात्री कृष्णासाठी पाळणा बांधुन त्यात बाळकृष्णाची मूर्ती सजून ठेवतात. पाळण्याला झोका देऊन गाणी गायली जातात. कृष्णाची पालखी मिरवतात, कृष्णाच्या रासलीला दाखवल्या जातात. भजन विविध खेळ खेळले जातात. 

कृष्णअष्टमीच्या दुसर्‍या दिवशी नवमीला गोपाळकाला महाराष्ट्रभर साजरा करतात. दहीहंडी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात फोडली जाते . दहीकाल्यातून एकात्मतेचा विचार दिसून येतो. श्री कृष्णाने गरीब-श्रीमंत असा भेदभाव कधीच केला नाही हे सुदामा भेटीतून दिसून येते. 

श्री कृष्णाने कालिया नागा पासून लोकांचे रक्षण केले. शिशुपालाचे शंभर अपराध माफ करुन त्याचा वध केला. प्रजेचा छळ करणार्‍या कंस मामाचाही वध केला व आपल्या जन्मदात्या आई - वडीलांना तुरुंग वासातून मुक्त केले. कुरुक्षेत्रावर ही अर्जुनाला गीता सांगून त्याला कर्तव्याची जाणीव करून दिली. द्रौपदीची लाज राखून भावाचे कर्तव्य पूर्ण केले.

अशा या कृष्णाने जीवनभर दुर्जनांचा नाश करून, सज्जनांना न्याय मिळवून दिला. धर्माचे रक्षण केले, म्हणुनच तर श्री कृष्णाला धर्म संस्थापक म्हणतात. 

जय श्री कृष्ण, राधेश्याम...🙏🏻🙏🏻🙏🏻

Post a Comment

0 Comments