By: school companion team
गणेशोत्सव निबंध
आपल्या राज्यात दिवाळी, गुढीपाडवा, दसरा, होळी असे अनेक सण साजरे केले जातात. पण या सगळ्या सणांमध्ये लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचा अतिशय आवडता सण म्हणजे गणपती उत्सव ! गणेशोत्सव सण साजरा करताना लोकांच्या आनंदाला पारावर उरत नाही ! गणपतीच्या या दहा दिवसांत लोक गणेशाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जातात. शेवटच्या दिवशी गणपती विसर्जन करतांना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असते. सर्वांचा एकच जयघोष चाललेला असतो- "गणपती बाप्पा~~ मोरया...", "पुढच्या वर्षी~~ लवकर या"
मराठी भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते. याच कारणामुळे दरवर्षी या दिवशी घरोघरी गणपतीचे आगमन होते.सर्वजण मोठ्या भक्तिभावाने गणपतीला घरी आणतात. पूजा आणि इतर विधी करून गणेशाची मूर्ती घरातील सजवलेल्या मखरात स्थानापन्न होते, आणि सुरू होतात ते भक्तिभावाने भारलेले दहा दिवस ! इतिहासात डोकावले तर असे लक्षात येते की, महाराष्ट्रात गणपती उत्सव पेशवे काळात सुरू झाला. नंतरच्या काळात लोकमान्य टिळकांनी त्याला सार्वजनिक उत्सवाचे रूप दिले. स्वातंत्र्याचे महत्व, समाजजागृती, देशभक्ती, विचारांची देवाणघेवाण जनसामान्यांमध्ये घडून यावी हा उद्देश डोळ्यांसमोर ठेऊन टिळकांनी हा उत्सव चालू केला.
गणपतीविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. जंगलात एके ठिकाणी शंकर आणि पार्वती वास्तव्याला होते.एकदा सकाळी पार्वती स्नान करण्यासाठी गेली असता, संरक्षणासाठी, कोणी येऊ नये म्हणून स्वतःच्या अंगाच्या मळीपासून एक पुतळा तयार करते.पुतळ्याला रखवाली करण्यासाठी बाहेर उभा करते. थोड्याच वेळात भगवान शंकर तिथे येतात. पार्वतीच्या आज्ञेप्रमाणे रखवालदाराने त्यांना आत जाऊ दिले नाही. शंकराला राग आला. त्यांनी तलवारीने त्याचे मुंडके उडवले. पार्वती बाहेर आल्यावर तिने हे पाहिले. तिला खूप वाईट वाटते. पार्वतीचे सांत्वन करण्यासाठी शंकर आपल्या नोकराला बोलवून आज्ञा करतात, "जा, आणि जो कोणी तुला प्रथम दिसेल त्याचे मस्तक काढून घेऊन ये." नोकर लगेच गेला, त्याला सर्वप्रथम एक हत्ती दिसला. त्याने क्षणाचाही विचार न करता त्याचे शीर कापले. शंकराकडे आणून दिले. शंकराने ते तोंड त्या पुतळ्याला बसवले. हत्ती म्हणजे गज, तोंड म्हणजेच आनन, म्हणूनच गणपतीला 'गजानन' असेही म्हणतात.
गणपतीला 'कृष्णदेवता' असेही म्हटले जाते.कृषीकीटकआदी उपद्रवापसून ही देवता शेतीचे रक्षण करते असे मानले जाते. गणपतीला 'मूषकवाहक' असेही म्हटले जाते. मूषक म्हणजेच उंदिर हा छोटासा प्राणी लंबोदर महाकाय गणपतीचे वाहन बनला.गणपती हा मंगलमूर्ती आहे. आणि म्हणूनच कुठल्याही शुभकार्याची सुरुवात 'श्री गणेशाने' करतात. गणपतीला बुद्धीची देवता असेही म्हटले जाते आणि म्हणूनच शिक्षणचाही 'श्री गणेशा' 'श्री' या आद्यक्षराने होतो. गणपतीला दुर्वा, शमी,मंदार या वनस्पती प्रिय आहेत. गणपतीला मोदक आणि नारळाची खिरापत प्रिय आहे.गणपती हा गणाचा पती, म्हणजेच योद्धा ! दुष्टांचा, तामसी प्रवृत्तीच्या लोकांचा रक्तपात करण्यात तो आनंद मानणारा आहे.
इतिहासात, भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात या सार्वजनिक सणाचे योगदान वैशिष्ट्यपूर्ण आहे.आजही, महाराष्ट्रात गणेशोत्सव हा अतिशय महत्त्वाचा, मराठी मनाचा एक चैतन्यदायी व वैभवशाली सण ठरला आहे. गणेशोत्सव म्हणजे एक आनंददायी सोहळा ! जाती, धर्म, गरीब, श्रीमंत यापलीकडे जाऊन ज्या सणात लोक एकत्र येतात तो सण म्हणजे- गणेशोत्सव !
0 Comments