By: school companion team
नमस्कार ! पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला. एक थोर स्वातंत्र्यसेनानी व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे. त्यांना मुले खूप आवडायची. मुले त्यांना 'चाचा नेहरू' अशा नावाने हाक मारायचे ! पंडित नेहरूंचा जन्मदिवस देशभरात 'बालदिन' म्हणून साजरा केला जातो. सादर करीत आहोत, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित एक मराठी नाट्यछटा ! चाचा नेहरूंच्या जीवनावर आधारित 'एकपात्री प्रयोग' !
चाचा नेहरू - नाट्यछटा
माझे मोठे भाग्य,यात काही शंका नाही. नक्कीच, भाग्यच म्हणावे लागेल, नाहीतर,अगदी सोन्यासारखी, देवाघरच्या फुलासारखी तुम्ही मुले माझा वाढदिवस थोडाच साजरा करत असता? काय म्हणता? " तुम्हाला मी खूप आवडतो?" हो, हो मला माहीत आहे ते, उगीचंच का तुम्ही माझा वाढदिवस एवढ्या आनंदाने दरवर्षी 'बालदिन' म्हणून साजरा करता? पण जरा ऐका,बालमित्रांनो, तुम्हांला म्हणून सांगतो, माझा वाढदिवस तुम्ही साजरा करता, त्यापेक्षाही जेव्हा तुम्ही माझ्याबद्दल वाचता,माझा जीवनक्रम जाणून घेता ना, तेव्हा मला कोणता आनंद होतो, म्हणून सांगू??
आता,हेच बघा ना..! तुम्हांला असे आनंदी, उत्साही बघून मलाही माझे बालपण आठवायला लागलंय. बाळांनो, कसं सांगायचं? आठवणी त्या आठवणीच! आणि बालपणीचा काळ म्हणजे घट्ट मिठी मारून ठेवावी अशी गोष्ट! आता, विषय निघालाच आहे तर, माझ्या बालपणीचा एक किस्सा ऐकाच बरे !
मी लहान होतो,म्हणजे असेल तिसरी चौथीला. माझ्या वडिलांना पक्षी खूप आवडायचे. आमच्या घरी एक पोपट पाळलेला होता. आमच्या घरापुढे एक आंब्याचं झाड होतं, त्या झाडावर या पोपटाचा पिंजरा लटकवलेला असायचा.मला हा पोपट खूप आवडायचा.तो पोपट जणू माझा मित्रच बनला होता.मी त्याच्याशी खूप साऱ्या गप्पागोष्टी करायचो.माझ्या मनातलं त्याला सांगायचो.आणि नुसतं मीच नाही हा,त्याच्याशी बोलायचो, तोही माझ्या कानात विठुविठू करत त्याच्या गूजगोष्टी सांगायचा. एके दिवशी मी असाच शाळेतून घरी आलो. या आमच्या पोपटाजवळ गेलो.विठुविठू करत पोपट माझ्याशी बोलू लागला,पण त्यादिवशी का कोणास ठाऊक पोपट आनंदी दिसत नव्हता.पोपटाकडे पाहून मला असे वाटले की, हा इथे या पिंजऱ्यात खुश नाहीये, त्याला मुक्त व्हायचंय! स्वतंत्र व्हायचंय!आकाशात मनसोक्त विहार करायचाय! मी शांतपणे त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडला. पोपटाने आनंदाने आकाशात भरारी घेतली. माझंही हृदय आनंदाने भरून गेलं. तेव्हड्यात तिथं आमच्या घरी काम करणारा माळी आला." हे काय केलंस तू, मालक नाराज होतील? असं म्हणाला. मी त्याला म्हणालो-आपला अवघा देश स्वतंत्र होऊ इच्छितोय. पोपटालाही स्वतंत्र व्हायचं होतं.स्वातंत्र्य सगळ्यांनाच मिळायला हवं…
आणि पुढं काय झालं? माळी माझ्याकडे पाहतच राहिला,त्याला माझे म्हणणे पटले होते.
बर, बालमित्रांनो, आता,एव्हढंच...तुम्हीसुद्धा ही गोष्ट कायम लक्षात ठेवा,स्वातंत्र्य हा हक्क आहे प्रत्येकाचा. हा हक्क प्रत्येकाला मिळायलाच हवा...या देशाचे भावी शिलेदार आहात बरं तुम्ही.. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा...बरं...चला ,निघतो मी आता..
-पिनेश जाधव.
0 Comments