Ticker

6/recent/ticker-posts

पंडित जवाहरलाल नेहरूंना पत्र | चाचा नेहरूंना पत्र | Chacha Nehruna Patra |

             By: school companion team

शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :



नमस्कार ! पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला. एक थोर स्वातंत्र्यसेनानी व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले आहे. त्यांना मुले खूप आवडायची. मुले त्यांना 'चाचा नेहरू' अशा नावाने हाक मारायचे ! पंडित नेहरूंचा जन्मदिवस देशभरात 'बालदिन' म्हणून साजरा केला जातो.  सादर करीत आहोत, पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र !


             चाचा नेहरूंना पत्र 

प्रिय चाचा,
सप्रेम नमस्कार….

            दरवर्षी 14 नोव्हेंबर ही तारीख जसजशी जवळ यायला लागते तसतसा आमचा उत्साह शिगेला पोचलेला असतो..त्याला कारणही तसेच असते,कारण या दिवशी तुमचा म्हणजे आमच्या प्रिय चाचांचा वाढदिवस असतो.खरं सांगू का चाचा? दरवर्षी तुमच्या वाढदिवसाची मी वाटच बघत असतो. तुमच्या वाढदिवसानिमित्त आमच्या शाळेत वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. खाऊ आणि पुस्तकांचे वाटप केले जाते.सर्व वातावरणच आनंद आणि उत्साहाने भारून गेलेले असते. तुमच्याबद्दलची माहिती ऐकून,वेगवेगळ्या गोष्टी ऐकून आम्हां सर्वांना खूप आनंद होतो.आमच्या अंगी नवीन उत्साह संचारतो.चाचा, तुम्ही आपल्या देशासाठी दिलेले योगदान पाहून आम्ही अचंबित होतो.तुमची राष्ट्रभक्ती पाहून आम्ही भारावून जातो. तुम्ही, महात्मा गांधी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर इत्यादी नेत्यांनी जो त्याग आपल्या देशासाठी केला,आपले जीवन ज्याप्रकारे देशासाठी अर्पण केले त्याचंच फलित म्हणजे आज आम्ही स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत, स्वच्छंदी,मनाप्रमाणे जीवन जगत आहोत.चाचा, तुम्हांला मुले खूप आवडायची. तुम्ही मुलांमध्ये रमत, त्यांना गाणी म्हणून दाखवत, त्यांच्याशी खेळ खेळत हे ऐकून आणि वाचून तर आम्हांला असे वाटते की, "प्रत्यक्ष तुमची भेट घेता आली तर?" पण, ते शक्य नाही,आणि म्हणूनच हा पत्रप्रपंच…

               चाचा,वरच्या ओळी वाचून तुम्हांला प्रश्न पडला असेल, यावर्षी असे काय झाले असेल की मी भूतकाळात डोकावू लागले आहे? चाचा याचं उत्तर थोडसं दुःखदायीच आहे. यावर्षी ईथे कोरोना या आजाराने कहर केला आहे. जगभरात हा साथीचा आजार पसरला आहे. आपल्या देशातही या आजाराने लाखो लोक मृत्युमुखी पडले आहेत.सर्व शाळा बंद आहेत.सध्या आम्ही घरूनच ऑनलाईन अभ्यास करत आहोत. आणि म्हणूनच यावर्षी तुमचा वाढदिवसही आम्ही ऑनलाईन साजरा करायचा ठरवले आहे.

            चाचा, कोरोना संपूर्ण देशभर पसरला आहे.कोरोनाने अवघ्या मानवजातीलाच पेचात पकडले आहे. पण अशा गंभीर परिस्थितीमध्ये काही क्षण डोळे बंद केले की माझ्या डोळयांसमोर येतात तुम्ही, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले,आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज! आणि मग अंगात विररस संचारतो, डोके शांत होते,आठवतो,तुम्ही सर्वांनी दाखवलेला धीरोदात्तपणा! तुम्हाला आठवून संकटाशी सामना करताना आपन अविचल राहिले पाहिजे ही अनुभुती आम्हाला प्राप्त होते.

              चाचा, आम्ही तुमच्यासारख्या देशभक्तांचा वारसा सांगणाऱ्या या भारतभूचीच लेकरं आहोत. आम्ही लढत आहोत या कोरोनाबरोबर.आणि आम्हांला खात्री आहे,आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. पुढच्या वर्षी तुमची जयंती पुन्हा शाळेतच मोठ्या आनंदाने साजरी करू….

             चाचा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

                                        तुमची लाडकी,                                                                           गायत्री.

     

हे ही वाचा : पंडित नेहरू मराठी कविता

हे ही वाचा : पंडित नेहरू नाट्यछटा, चाचा नेहरू एकपात्री.




Post a Comment

0 Comments