Ticker

6/recent/ticker-posts

दि प्रिन्सेस - संस्थानांच्या विलिनीकरनाचा भावस्पर्शी मागोवा घेणारा दस्तऐवज !

मनोहर माळगावकर लिखित द प्रिन्सेस

By: school companion team

शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करा : फेसबुकव्हॉट्सॲप |टेलिग्राम |शेअरचॅट |ट्विटर 



















अवांतर वाचन

दि प्रिन्सेस - संस्थानांच्या विलिनीकरनाचा भावस्पर्शी मागोवा घेणारा दस्तऐवज ! 

बारावीपर्यंतच्या इतिहासाच्या पुस्तकात 'संस्थाने' या विषयावर अधिक सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. कदाचित भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या विषयामध्ये हा भाग तितकासा महत्वाचा वाटला नसेल. ज्या काही थोड्याफार ओळी आहेत त्या साधारण अशा आहेत- 'त्या काळी भारतात अनेक संस्थाने होती.' 'स्वातंत्र्यानंतर ही संस्थाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली खालसा करून त्यांचा समावेश भारतात करण्यात आला.' चार ओळीत संस्थाांनाबद्दलचा इतिहास संपवून टाकला असला तरी तो तेव्हढाच मर्यादित नक्कीच नव्हता !


एकेकाळी भारताच्या नकाशावर दोनच रंग होते.एक लाल आणि एक पिवळा. लाल ब्रिटिश राज्यकर्त्यांचा आणि पिवळा राजेरजवाड्यांचा! म्हणजेच संस्थानिकांचा ! सुमारे शंभर वर्षे हे दोन रंग त्याठिकाणी अव्याहतपणे नांदत होते.पण ब्रिटिश राज्यकर्ते निघून गेले, आणि लाल रंगाबरोबरच पिवळा रंगही पार पुसून गेला !


बेगवाड नावाचे एक कल्पित संस्थान आहे.आपल्या मतांवर ठाम असणारे, आग्रही, नेकदार,  'माझे हे बेगवाडचं  राज्य यावच्चंद्रदिवाकरौ नांदनार आहे, आणि माझ्या बेडर घराण्याकडेच ते वंशपरंपरागत राहणार आहे' अशी पक्की खात्री असणारे दादामहाराज या संस्थानाचे संस्थानाधिपती आहेत. अभयराज हा त्यांचा सुपुत्र. दादामहाराज हे भूतकाळात रमणारे, तर अभयराज अगदी विरुद्ध स्वभावाचा- वर्तमानकाळात जगणारा, आधुनिक विचारसरणी, आणि येणाऱ्या काळाची पावले अगोदरच ओळखणारा, आणि त्यानुसार पावले टाकणारा किंबहुना टाकायला भाग पडलेला !
        
 'दि प्रिन्सेस' मधे अभयराज आपल्याला संस्थानिकांच्या या आगळ्यावेगळ्या जगात घेऊन जातो. कोणताही आडपडदा न ठेवता तुम्हाला तो संस्थांनामधील कोपरा नी कोपरा फिरवून आणतो.


अभय, त्याच्या अगदी बालपणापासून सुरुवात करतो. एकप्रकारे संस्थानाच्या सुरुवातीच्या कालखंडात आपण प्रवेश केलेला असतो. राजाचे शाही जीवन, त्यांचा शिकारीचा शौक, उंची मद्य, राजमहालाचे वैभव आपण एक एक गोष्ट अनुभवत पुढे जातो. यादरम्यानचा एडक्याच्या शर्यतीचा प्रसंग खूप रोचक आहे. अभयराजचं आवडतं कोकरूच दादामहाराज लढतीत उतरवतात आणि नंतर त्याचंच मांस भाजून थाळीत मेजवाणीसाठी ! दादामहाराज आपल्या मुलाला राजा बनविण्याची तयारी करत करत होते ! ते अभयला सांगत होते- दुःखाच प्रदर्शन न करण्यातच खराखुरा मर्दपणा आहे. अश्रू हे दुबळ्यांचं देणं आहे. गोष्ट पुढे जात राहते आणि अभयराजची दादामहाराजांबद्दलची आपले वडील म्हणून निष्ठा आपल्याला दिसतेच पण तो दादामहाराजांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्यातला नाही हेही आपल्या  लक्षात येते.


त्यानंतर अभयराज आपल्याला शाळा आणि सवंगडयाबाबत सांगतो. आपण त्या काळात प्रवेश करतो. आपल्या मुलांना वेगवेगळया विद्या जसे की घोडदौड, पोहणे, भालाफेक, शिकार  इत्यादी शिकविण्यासाठी वेगवेगळे शिक्षक असत. अभयला शिकवण्यासाठीही अनेक शिक्षक होते. इंग्रजी शिकवण्यासाठी मोअरटन  साहेब होते. यांचा खास उल्लेख यासाठीच की प्रत्येकाला असा एखादा शिक्षक आपल्या आयुष्यात नक्कीच मिळायला हवा. कोणत्या परिस्थितीत आपले वागणे कसे असायला हवे याचे अगदी सहज धडे मोअरटन साहेबांनी अभयला दिले.अभयच्या अवघडातील अवघड प्रश्नांचे उत्तर त्यांच्याकडे असायचे. राजपुत्र अशा काही विद्या घरी राहूनच शिकत. पण त्याचबरोबर संस्थानिकांच्या स्वतःच्या शाळाही असत. अभयराज सुध्दा या शाळेत जायचा. या शाळेत खालच्या जातीच्या   मुलांना अस्पृश्य समजले जात. त्यांना शाळेत पाठीमागे उघड्यावर बसवले जात. याच काळात अभयराजची चांभार जातीच्या कनकचंदशी मैत्री जडली.  अन्यायाने पेटून उठलेला कनकचंद पुढे जाऊन पांढरी टोपी धारण करतो. (संस्थानाची टोपी वेगळी म्हणजे निळी-पांढरी असायची) आणि संस्थांनी सत्ता उलथून टाकण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो.


राण्या आणि रखेल्या ! संस्थानिक हे जणू पुरातन काळाच्या उदरातून जन्मलेले होते. त्यांचं नातं हे शिवाजी महाराजांच्या काळाशी किंवा सम्राट अशोकाच्या काळाशी ! आधुनिक काळाशी त्या जगाचं कसलंच नातं नव्हतं. अभयराज सांगतो- कित्येक वेळा मला दादांच्या वागणुकीचा काहीच अर्थ लागत नसे त्याला हेच कारण असावे. संस्थानाधिपतींना किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना दहा बारा लग्नाच्या बायका असत पण साऱ्याच बायकांना महाराणीपदाचा मान कधीच मिळत नसे. त्यांच्यापैकी एकच बडी महाराणी असे. महाराणीला स्वतंत्र ध्वजाचा मान असे आणि पायात सोन्याच्या साखळ्या घालण्याचा अधिकार असायचा. तिचा सर्वात वडील मुलगा युवराज आणि तोच पुढे संस्थानाधिपती होई. हा सारा सन्मान बडी महाराणीला मिळत असे, पण पतिनिधनानंतर सतीचं दिव्यही तिलाच करावं लागे ! याच जोडीने राजवंशात रखेलीपदाचीही चाल पडलेली होती. ही कशी सुरू झाली याबाबतही कादंबरीत सांगितले आहे.


स्वातंत्र्याची चळवळ ! अभयराजच्या लहानपणी महात्मा गांधींची चळवळ जोमात आली होती.या चळवळींची पाळंमुळं खणून काढण्यासाठी ब्रिटिशांनी कंबर कसली होती. ह्या चळवळींचे लोण आपल्यापर्यंत पोहचणार याची खबरदारी दादामहाराजही घेत होते. फक्त तेच नव्हे तर सर्वच संस्थानिक ही काळजी घेत होते ! अर्थात चळवळींचा उपद्रव कोणालाही टाळता आला नाही. संस्थानिक आणि सामान्य जनता यांच्यातील अंतर कसे वाढत गेले, वर्तमानपत्रांनी कोणती महत्वाची भूमिका निभावली याची सविस्तर माहिती आपल्याला अभयराजच्या मनोगतातून समजते.


पुढे अभयराजची कॉलेजमध्ये रवानगी होते. प्रिन्सेस कॉलेज, अभयराजचा सैन्यात जाण्याचा निर्णय, त्यासाठी सिमलावारी, दुसऱ्या महायुद्धातला प्रत्यक्ष सहभाग, 'मिनी' बरोबरची मैत्री, ब्रिटिशांचे डावपेच, स्वातंत्र्य चळवळ, दादामहाराजांचे मानसिक द्वंद्व सर्व काही आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.


 'मी माझे बेगवाड संस्थान कदापी विलीन होऊ देणार नाही' अशी दादामहाराजांनी प्रतिज्ञा केलेली असते. काय होते? त्यांची प्रतिज्ञा ते खरी करून दाखवतात की नाही? ते कोणता मार्ग स्वीकारतात ? कादंबरीतील हे एक हृदयस्पर्शी गूढ आहे ! अभयराज आपली भूमिका कशाप्रकारे निभावतो ? विविध संस्थानिकांचे संबंध कसे होते ? संस्थानातील चालीरिती, संस्थानातील हरएक व्यवहार, उच्चनीच भाव, प्रेमाचे विविध रंगढंग....हे सारेच चित्तथरारक आहे.


आणखी महत्वाचे म्हणजे, ही एक कादंबरी आहे असे मानले तरी, गावागावातील स्वातंत्र्याची चळवळ, इंग्रज माघारी परतत असतानाच्या गावपातळीवरील घडामोडी, ज्या स्वातंत्र्यासाठी अट्टाहास चालला होता, त्याच वेळी गावागावातील लोकं काय करत होती? त्यांच्या मनात कोणते विभ्रम निर्माण झाले होते ? संस्थानामधील लोकांना स्वातंत्र्य हवे होते का ? आपण जो इतिहास वाचला आहे, त्याच्यातील सर्वच गोष्टी जशा सांगितल्या आहेत तशाच झाल्या आहेत का? इत्यादी प्रश्नांना स्पर्शून जाणाऱ्या अनेक घटना यात आल्या आहेत.


कादंबरीचे लेखक मनोहर माळगावकर मुंबईचे. त्यांचे आजोबा एका संस्थानात प्रधान असल्यामुळे त्यांचे बालपण संस्थानी वातावरणात गेले.कादंबरी वाचतांना संस्थानाबद्दल त्यांच्या मनात असलेली ओढ जाणवतेही मात्र तरीसुद्धा दोन्ही बाजू त्यांनी अतिशय संयतपणे मांडल्या असेच म्हणावे लागेल. आणि त्यामुळेच त्यांची ही कादंबरी जगभरात मान्यता पावली आहे. अत्यंत उत्कंठावर्धक अशी ही कादंबरी कोणालाही आवडेलच पण इतिहासाविषयी कुतूहल असणाऱ्यांसाठी ही एक मेजवानीच !


                                                     
लेखक- कर्नल मनोहर माळगावकर
अनुवाद - भा. द. खेर
प्रकाशक - कॉन्टिनेन्टल प्रकाशन
किंमत -200 रुपये

Post a Comment

0 Comments