ट्रेन टू पाकिस्तान-सीमेलगतच्या एका गावाच्या दृष्टिकोनातून फाळणी !
July 11, 2020
ट्रेन टू पाकिस्तान-1947 साली झालेल्या देशाच्या फाळणीनंतर
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला.त्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.....असे आपण लहानपणापासून वाचत आलेलो असतो.ह्याच ओळी मोठ्या त्वेषाने भाषणातून बोलतही असतो. आपल्या देशाचा अभिमान आणि क्रांतिकारकांविषयी आदरभाव या काही ओळींतून व्यक्त होत असतो. आणि त्यात काही चुकीचं नाही...! पण 15 ऑगस्टच्या फक्त एक दिवस अगोदर 'ब्रिटीश भारताचे' दोन तुकडे झाले होते. आणि तो दुसरा तुकडा होता- पाकिस्तान.
ब्रिटिशांची भारतावर सत्ता होती.असं म्हणतात की 1857 साली स्वातंत्र्याची पहिली ठिणगी पडली.त्यानंतर अनेक चढ-उतार आले, 1942 साली महात्मा गांधींनी 'भारत छोडो' आंदोलन छेडले. त्यावेळी इंग्रज दुसऱ्या महायुद्धात मेटाकुटीला आलेले होते, त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचे आश्वासन दिले.( इंग्रजांच्या सैन्यात सुमारे 25 लाख सैनिक भारतीय होते) त्याकाळी, भारतात फक्त दोनच पक्ष होते, एक काँग्रेस, आणि दुसरा मोहम्मद अली जिना यांचा मुस्लिम लीग. तर, आता, या मुस्लिम लीगच्या गटाने, इंग्रजांकडे,भारतात मुस्लिम लोक सुरक्षित नाहीत, त्यांच्या हितसंबंधांचा विचार करता आमचा वेगळा देश असावा, अशी मागणी केली. ही 'फाळणीची' मागणी होताच सगळीकडे दंगली उसळल्या.त्यात अर्थातच, एक गट आम्हांला आमचा वेगळा देश हवा, तर दुसरा गट अखंड भारत असावा असे म्हणणारा असेल असे जरी आपल्याला आता, वाटत असेल तरी त्यापेक्षा त्या 'जातीय' दंगलीच जास्त होत्या..आणि मग, या दंगली बघून (किंवा आणि काय मनात योजून) त्यावेळेसचा व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन याने फाळणीला मान्यता दिली...! आता, यामध्येही अनेक वाद आहेत, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, माउंटबॅटन यांचे त्यावेळेस असलेले विचार, त्यांनी केलेल्या कृती यांना धरून त्यांना बरोबर किंवा चूक ठरवणारे गट दोन्हीही देशात आहेत.दोन्ही गट एकमेकांवर चिखल उडवण्यात धन्यता मानतात.
पण, सर्वांत मोठा प्रश्न फाळणी म्हणजे काय? फाळणी म्हणजे जागेचे दोन तुकडे? फाळणी म्हणजे अर्धे इकडे,आणि अर्धे तिकडे, झालं संपलं.! असं, असतं काय?कागदावर एक निर्णय झाला, या रेषेपासून तिकडे पाकिस्तान, आणि इकडे भारत,इतकं सोपं असतं का? भारत पाकिस्तान फाळणीने दोन्ही बाजूकडच्या ज्यांची काहीच चुकी नाही, जे अगदी गुण्यागोविंदाने एकाच गावात जीवन जगत होते, जे निष्पाप होते, अशा लोकांवर अनन्वित अत्याचार झाले त्याबद्दल आपण जाणुन घेणार आहोत की नाही. दोन्ही बाजूकडच्या स्रियांवर अत्याचार झाले. निष्पाप लहान मुलं, तरुण मुलं मारली गेली. अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.एका रात्रीत वर्षनुवर्षं जिथं राहिलो ते आपलं गाव, आपलं घर, दार, जमीन, आपलं सर्वस्व सोडून द्यायचं म्हणजे काय असतं? एका रात्रीत आपली माणसं, आपलं प्रेम विसरायचं म्हणजे काय असतं? अंगावर असणाऱ्या आपल्या कापड्यानिशी घर सोडणं म्हणजे काय असते? ' मनावर दगड ठेवणं' ही अवस्था काय असते? हे ज्यांना या फाळणीमुळे अनुभवावे लागले, त्यांची साधी आठवण तरी आपण काढणार आहोत की नाही?
प्रश्नांची यादी खूप मोठी असणार आहे. त्या सर्वांची खरीखुरी उत्तरेही मिळणार नाही, हेही शाश्वत सत्य आहे. पण काय घडलं असेल फाळणी झाली असेल तेव्हा. काय प्रतिक्रिया असतील त्यावेळी लोकांच्या.दंगली दोन्ही बाजूकडून उसळल्या, त्याच्यापाठीमागे काय कारणं असतील? कालपर्यंत एका ताटात जेवणारी माणसं एकमेकांच्या विरोधात का उभी ठाकली असतील?अशा प्रश्नांची उत्तरे ट्रेन टू पाकिस्तान या खुशवंत सिंग लिखित पुस्तकात आपल्याला मिळतात.
सतलज नदीच्या काठी वसलेलं, मनोमाजरा नावाचं अगदी छोटंसं खेडं. या गावात तीनच विटांची घरं होती, एक लाला रामलाल सावकाराचं, एक गुरुद्वारा,आणि एक मशीद. मनोमाजरात जवळपास 70 कुटूंब राहतात.साधारण सारख्या संख्येने शिखांची आणि मुसलमानांची घरं. मनोमाजराच्या उत्तरेला साधारण मैलभर अंतरावर सतलजवरून रेल्वेचा पूल जातो. .मनोमाजरा हे रेल्वे स्थानाकांमुळेच ओळखलं जातं.दिल्लीवरून लाहोरला, लाहोरवरून दिल्लीला जाणाऱ्या पॅसेंजर गाड्यांच्या वेळापत्रकानुसारच ईथल्या लोकांचा दिनक्रम चालतो.आणखी एक गोष्ट महत्वाची होती, आणि ती म्हणजे रेल्वे पुलाच्या उत्तरेकडे असणारे अधिकारी विश्रामगृह. त्यामुळेही मनोमाजरा शासकीय वर्तुळात महत्वाचं होतं.
मनोमाजरा हे गाव तुमच्या आमच्या गावसारखच! सर्वच गावांत जो एक ठहराव असतो, इथेही होता.भारत आणि पाकिस्तान सीमेनजीक असूनही या गावातील लोकांना फाळणी झालेलीही पूर्णपणे समजलेले नसते. ते त्यांच्याच धुंदीत जगत होते.मशिदीतला मौलवी इमाम बक्ष प्रार्थनेची वेळ झाल्यावर मक्केकडे तोंड करून ' अल्ला हो अकबर' ची बांग देतो. मौलवीची बांग संपेपर्यंत गुरुद्वारातला भाई( मितसिंग) अंथरुणात लोळत असतो.मग तोही उठतो,आणि प्रार्थना गुणगुणायला लागतो.गुरुद्वारा आमचं, मशीद तुमची असा काही प्रकार या गावात नव्हता.तो बहुधा कुठेही नसायचा.सकाळी गावातील सगळे उठून आपापल्या कामाला लागतात.संध्याकाळी मालगाडी आली म्हणजे एकमेकांना 'मालगाडी आली' असे सांगतात. म्हणजे काय तर आता झोपुया.
आणि मग पडते ती ठिणगी...गावात जुग्गुतसिंग नावाचा एक गुंड राहत असतो. जुग्गुतसिंग आणि मौलवी इमाम बक्ष यांची मुलगी नूरण हे एकमेकांवर प्रेम करत असतात.....तो काळच वेगळा होता. गुंडाचेही काही अलिखित नियम असायचे. आपल्या स्वतःच्या गावात चोरी, वाईट काम न करण्याचा. एके दिवशी गावातील सावकार लाला रामलालचा जुग्गुतसिंगचे प्रतिस्पर्धी मल्ली आणि त्याचे साथीदार खून करतात. त्याच्याच दुसऱ्या दिवशी गावात इकबाल(सिंग/ मोहम्मद) नावाचा समाजसेवक गुरुद्वारामध्ये राहण्यासाठी येतो. मी लोकांना हिंसाचार, राजकारण यापासून परावृत्त करण्यासाठी आलो आहे असे इकबाल सांगतो. याच वेळी नदीच्या बाजूला असलेल्या डाक बंगल्यावर मॅजिस्ट्रेट हुकूमचंद आराम आणि हवापालट करण्यासाठी आलेले असतात. त्यांची सेवा करायला जवळच्याच पोलीस स्टेशनमधील सब-इन्स्पेक्टर हजर असतो. पोलीस मनोमाजरात येतात, आणि जुग्गुतसिंग आणि इकबाल दोघांनाही घेऊन जातात.एके संध्याकाळी पाकिस्तान वरून येणारी एक ट्रेन मनोमाजरात थांबते. पण ट्रेन मधून कोणीही खाली उतरत नाही.उतरतील कशी..?आतमध्ये कोणीही जिवंत नसते...!
मॅजिस्ट्रेट हुकूमचंद कोणता विचार करून जुग्गुतसिंग आणि इकबालला अटक करतात. खऱ्या गुन्हेगारांना ते पकडतात का?त्या संध्याकाळी आलेल्या ट्रेनला बघून मनोमाजरातील लोकांची मानसिक स्थिती कशी झाली? दंगल हवी असणारे टोळके मनोमाजरातील शिखांना कसे भडकवतात? मनोमाजरातील मुस्लिम लोकांचं काय होतं? ते तिथेच राहतात की नाही? जुग्गुतसिंग आपल्या गावासाठी आपल्या प्रेमासाठी काही करतो की नाही?एकूणच मनोमाजराचं काय होतं? या प्रशांची आपण पाठलाग करतो,आणि हाती लागते एक मोठी उत्कंठावर्धक कहाणी! मनोमाजराची !
ही एक कादंबरी आहे. ज्याने स्वतः फाळणी अनुभवली आहे, अश्या लेखकाने ती लिहिली आहे. लेखकाला असे म्हणायचे आहे- असे मला वाटते- फाळणी हा काय इथल्या सर्वसामान्य लोकांसाठी(मुस्लिम असो की हिंदू) खूप महत्त्वाचा मुद्दा नव्हता. मुळात भारतातील अनेक प्रदेशात सामान्य लोकांना आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे हेच जणू ठाऊक नव्हते. किंवा स्वातंत्र्य मिळाल्याने आपलं काही भलं होणार आहे, याची त्याला खात्रीही नव्हती-
इकबालनं बाजू घेण्याचा प्रयत्न केला, "का तुम्हां लोकांना स्वातंत्र्य नको होतं? गुलामगिरीरीतच आयुष्य काढायचं होतं का?"
लंबारदार म्हणाला," स्वातंत्र्य ही नक्कीच चांगली गोष्ट असेल.पण यातून आम्हाला काय मिळेल? बाबूसाहिब, तुमच्यासारख्या सुशिक्षित लोकांना इंग्रज कार्यकबे त्या नोकऱ्या मिळतील, आम्हाला जास्तीची जमीन किंवा म्हशी मिळतील?"
"नाही" मुस्लिम म्हणाला. "स्वातंत्र्य हे फक्त सुशिक्षित लोकांसाठी आहे जे त्यासाठी झगडले. आम्ही आधी इंग्रजांचे गुलाम होतो आणि आता सुशिक्षित भारतीयांचे किंवा पाकिस्तान्यांचे गुलाम होऊ."
वरील मुद्दा सर्वसामान्यांच्या दृष्टीकोनातून होता. स्वतंत्र भारतात जे सरकार चालवणारे होते, पुढारी, नेते नव्हे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनोभूमिका काय होत्या? या दृष्टिकोनातून या कादंबरीचा विचार केला असता, मॅजिस्ट्रेट हुकूमचंदचे पात्र आपल्या लक्षात येईल. लेखकाने मोठ्या खुबीने या पात्राकडून सरकारी पातळीवर या फाळणीकडे कसे बघितले गेले, हे सांगितले आहे.
जेव्हा हुकूमचंद पात्र कादंबरीत येते, तेव्हा भिंतीवरल्या पालींचेही वर्णन येते. पाल त्यांच्या अंगावर पडते आणि एक थंड शिरशीरी आपल्या मनावरही उमटते. 'ते आपले हात पुन्हा पुन्हा धुतात, पण घासण्यामुळे किंवा धुण्यामुळे स्वच्छ होणारी ती घाण नव्हती.....' या वर्णनातून ते सरकारी अधिकारी होते आणि त्यांचे हात बरबटलेले होते, काही निर्णय त्यांना नाविलाजास्तव घ्यावे लागत होते हे सत्यच लेखक दाखवून देतो. पण हेच हुकूमचंद पूर्णपणे कोलमडून जातात, जेव्हा त्यांच्यासमोर फाळणीची ही दोन्ही बाजूकडून होणारी कत्तल होते. फाळणीने ज्यांचे जीवन अक्षरशः नरकसमान झाले, फाळणीमुळे ज्यांच्या मनावर झालेल्या जखमा कधीही भरून येणार नाही, ज्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झालाय, अशा त्यांच्या ओळखीच्या हिंदू-मुस्लिमांना ते काय उत्तर देणार होते. त्यातील अनेक जण त्यांचे मित्र होते, कोणी नातलग होते. त्यांची हतबलता ते लपवू शकत नाही-ते म्हणतात-
हे तुमचे श्रीयुत नेहरू, खूपच महान आहेत....ते बोलतात देखील किती छान, हेच बघा ना, ' फार पूर्वी आपण नियतीशी करार केला होता आणि आता त्या प्रतिज्ञेला पूर्णत्वाकडे नेण्याची वेळ आली आहे, जरी पूर्णपणे शक्य नसलं तरी बऱ्याच प्रमाणात.' होय, श्री.पंतप्रधान, तुम्ही तुमचा करार पूर्ण केलाय. तसा तो इतर अनेकांनीही केलाय. नियतीशी करार!
आताच्या, पिढीसाठी फाळणी हा एक फक्त शब्द आहे! एक भूतकाळातली घटना आहे. तर काही लोकांसाठी आजही राजकारण करण्यासाठी, लोकांच्या भावना भडकवण्यासाठी, महत्वाचा मुद्दा आहे.सत्तेत येण्यासाठी म्हणा किंवा सत्तेवर राहण्यासाठी म्हणा राजकारणी फाळणीच्या विषयाचा पुरेपूर फायदा करून घेतांना दिसतच असतात.फाळणीसाठी कोण जबाबदार? हा आजघडीला अजिबात महत्वाचा नसणारा प्रश्न येणाऱ्या शंभर वर्षातही सुटणार नाही,आणि राजकारणी लोक त्याअडून आपापल्या पोळ्या भाजत राहणार...
पण, मग सवाल आहे या देशातील तरुणांचा! येणाऱ्या भविष्याच्या शिलेदारांचा! भूतकाळातील या अतिशय अमानुष घटनेतून तो काही शिकणार आहे काय?या गटातटाच्या, जातीय राजकारणातून स्वतःला दूर करून त्या 'दोन्ही बाजूच्या' निष्पाप बळी गेलेल्या आत्म्यांना आदरांजली वाहणार आहे काय? असाच प्रश्न जणू लेखकाला विचारायचा आहे......!
0 Comments