महावाचन उत्सव 2024 | उपक्रमाचे उद्दिष्टे | उपक्रमाचा कालावधी | उपक्रमाचे स्वरूप व अंमलबजावणी | उपक्रमाचे परीक्षण व पारितोषिके| महावाचन उत्सव 2024 रजिस्ट्रेशन|
August 20, 2024
महावाचन उत्सव 2024 | उपक्रमाचे उद्दिष्टे | उपक्रमाचा कालावधी | उपक्रमाचे स्वरूप व अंमलबजावणी | उपक्रमाचे परीक्षण व पारितोषिके| महावाचन उत्सव 2024 रजिस्ट्रेशन|
वाचन हे व्यक्तिमत्त्व विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते, विचारांची क्षितिजे विस्तारित होतात, आणि व्यक्तीमध्ये सर्जनशीलता वाढते. विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे, आणि शैक्षणिक पुस्तकांचे वाचन करून व्यक्ती नवीन माहिती आणि दृष्टिकोन प्राप्त करते. वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्ये सुधारतात, आणि व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते. वाचन केल्याने तणाव कमी होतो आणि मेंदूला आराम मिळतो. तसेच, वाचनामुळे व्यक्तीला आत्मविश्वास आणि आत्म-साक्षात्कार होतो. म्हणूनच, वाचन ही एक आवश्यक व उपयुक्त क्रिया आहे. व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती समाजात रुजविणे आवश्यक आहे.
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे त्यांच्या अभ्यासाच्या गतीत वाढ होते. वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात भर पडते. तसेच वाचनामुळे त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळते.
राज्यातील सर्व शाळांमध्ये "महाराष्ट्रातील वाचन चळवळ" हा उपक्रम राबविण्याबाबतचा निर्णय दिनांक २२ नोव्हेंबर, २०२३ रोजीच्या संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयाने घेण्यात आला होता. मा. राज्यपाल महोदय यांच्या शुभहस्ते व मा. मुख्यमंत्री, मा. शालेय शिक्षण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ०५ डिसेंबर, २०२३ रोजी सदर उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सदर उपक्रमामध्ये ६६,००० शाळा व ५२ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर उपक्रमास विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. सदर उपक्रम रिड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबविण्यात आला होता. सदर उपक्रमास रिड इंडिया सेलिब्रेशन यांनी विना आर्थिक मोबदला सहकार्य केले होते.
सन २०२४-२५ या वर्षात स्टार्स या केंद्र पुरुस्कृत योजनेंतर्गत SIG १ मधील परि. १.२. ७ अन्वये Foundation literacy & Numeracy या मुख्य घटकांतर्गत NIPUN Utsav, Reading campaign & other State initiatives या उप घटकांसाठी रु. ८७५.०० लक्ष इतका निधी उपलब्ध आहे. या उप घटकांच्या अंमलबजावणीसाठी तसेच सन २०२३-२४ मधील वाचन चळवळ मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर सन २०२४-२५ या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये "महावाचन उत्सव-२०२४" हा उपक्रम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
काय आहे शासन निर्णय :
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सन २०२४-२५ या वर्षात "महावाचन उत्सव-२०२४" हा उपक्रम रिड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबविण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. या उपक्रमाकरिता ज्येष्ठ अभिनेते श्री. अमिताभ बच्चन यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यास देखील शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
सदर उपक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-
१. उपक्रमाची व्याप्ती:-
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता ३ री ते १२ वी या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे. यासाठी इयत्ता ३ री ते ५ वी इयत्ता ६ वी ते ८ वी व इयत्ता ९ वी ते १२ वी अशा तीन इयत्तानिहाय वर्गवारी निश्चित करण्यात येत आहेत .
२. उपक्रमाची उद्दिष्टे:-
i) वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे.
ii ) विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे.
iii) मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे.
iv ) दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करुन देणे.
vi) विद्यार्थ्याच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे
३. उपक्रमाचा कालावधीः-
दिनांक २२ जुलै, २०२४ ते दिनांक ३० ऑगस्ट, २०२४ या कालावधीत "महावाचन उत्सव-२०२४ हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी राबवावयाचा आहे.
४. मूल्यांकनाचे स्वरुप :
महावाचन उत्सव-२०२४ या उत्सवात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखनांचे मूल्यांकन खालील प्रमाणे करावे.
उपरोक्त तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे १० च्या मर्यादित शाळेच्याच शिक्षकांनी गुणदान करावे. शिक्षकांच्या केलेल्या गुणदानानंतर नियुक्त केलेल्या समितीकडून तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर गुणांकन करण्यात यावे. शाळांनी आपल्यास्तरवरील प्रथम, द्वितीय, तृतीय विदयार्थीची निवड करावी. प्रत्येक शाळेने फक्त प्रथम तीन क्रमांकाच्या विदयार्थ्यांची नावे तालुकास्तरावर पाठवावी.
प्रत्येक तालुक्यातील निवड करण्यात आलेले प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक जिल्हयास कळविण्यात यावे.
तालुक्यातून पात्र विदयार्थ्यांच्या यादीतून जिल्हास्तरावर (मनपासह) प्रथम, द्वितीय, तृतीय विदयार्थ्यांची निवड करण्यात यावी.
जिल्हयांकडून पात्र विदयार्थ्यांमधून राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय विदयार्थ्यांची निवड करण्यात यावी.
५. उपक्रमाचे स्वरुप :-
५.१ या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी https://mahavachanutsav.org या नावाने web application विकसित करण्यात आले आहे. राज्यातील सर्व शाळांना उपक्रमाच्या नोंदणीकरिता ही प्रणाली उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
५.२ या उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य जगातील नावाजलेल्या साहित्यकांचे विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे इ. साहित्याची निवड करुन वाचन करतील.
५.३ सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील व तो विचार लिखित स्वरुपात शाळांमार्फत https://mahavachanutsav.org च्या web application वर अपलोड करतील. यासाठी गट अ-इयत्ता ३री ते ५ वी करिता ५० ते ६० शब्द, गट ब- इयत्ता ६वी ते ८वी करिता ६० ते १०० शब्द व गट क-इयत्ता ९वी ते १२वी करिता १०० ते १५० शब्दांची मर्यादा आहे.
५.४ सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकाचा सारांश देणारा एका मिनिटाचा व्हिडिओ/ऑडिओ क्लिप तयार करतील या व्हिडिओ/ऑडिओ ची तपासणी करुन हे व्हिडीओ/ऑडिओ https://mahavachanutsav.org च्या web application वर मुख्याधापकांनी अपलोड करावे. अपलोड करावयाचे व्हिडिओ/ऑडिओ महावाचन उत्सवाशी संबंधित असल्याची खात्री मुख्याध्यापकांनी करणे आवश्यक राहील.
५.६ वाचनीय पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मेळावे दि.२६/०८/२०२४ ते दि. ०४/०९/२०२४ या कालावधीत भरविण्याची जबाबदारी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर अनुक्रमे गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांची आहे. यासाठी त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय/खाजगी ग्रंथालयाची मदत घ्यावी.
कार्यक्षेत्रातील अधिकाअधिक शिक्षक, पालक व विदयार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी. यासाठी लागणारी तरतुद उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
५.६.१ उपरोक्त तरतुद जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
५.६.२ जिल्हयातील शासकीय ग्रंथालय, खाजगी ग्रंथालय, प्रकाशकांना तसेच शासकीय प्रकाशकांना / वितरकांना आमंत्रित करुन ग्रंथ प्रदर्शन / मेळावा आयोजित करावा.
५.६.३ विदयार्थ्यांना वाचनासाठी वयानुरुप विविध प्रेरणादायी पुस्तके, कथा, कविता, कांदब-या, आत्मचरित्र, प्रवास वर्णन इ. प्रदर्शनात / मेळाव्यात असावेत.
५.६.४ ग्रंथ प्रदर्शन / मेळावे सर्वांसाठी सोयीचे ठिकाणी भरवावेत.
६. अंमलबजावणी करणारी यंत्रणा :-
सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीकरिता शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राबाबत ही जबाबदारी संबंधित समकक्ष अधिकाऱ्यांची असेल. तालुकास्तरावर गट शिक्षणाधिकारी यांच्या अधिनस्त सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना सहभागी करुन घ्यावे त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.
७. परिक्षण व पारितोषिके :-
उपक्रमासाठी तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक अनुज्ञेय असेल. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राचा दर्जा स्वतंत्र शैक्षणिक विभागाप्रमाणे असेल. प्रत्येक स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावरील विद्यार्थ्यांची निवड तीन गटांमध्ये स्वतंत्रपणे करावी.
महावाचन उत्सव-२४ या उपक्रमाची अंमलबजावणी ही सर्व माध्यमांच्या सर्व शाळामध्ये राबविण्यात येणार असल्याने या उपक्रमात सहभागी विदयार्थ्यांचे लेखन/व्हिडीओ अपलोड केल्यानंतर सहभाग प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात येईल.
महावाचन उत्सव-२४ या उपक्रमाकरिता उपलब्ध करुन दिलेले web application वापरासबंधीची काही अडचणी असल्यास admin@mahavachanutsav.org या mail करावा तसेच तांत्रिक सहाय्य मिळण्याकरिता संपर्क क्र. ९१३६३८२३५५ यावर संपर्क करावा.
प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना जिल्हास्तर व गट शिक्षणाधिकारी यांना तालुकास्तरकरीता नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. या उपक्रमात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा सहभागी होतील याची दक्षता घ्यावी. शिक्षणाधिकारी / गट शिक्षणाधिकारी यांनी वेळोवेळी आढावा घेऊन उपक्रम यशस्वी करावा.
0 Comments