By: school companion team
सायंकाळी सोने लुटुनी मोरू परतुनी आला | बहीण काशी ओवाळी मग त्याला | दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा |
मराठी पंचांगातील 'आश्विन शुद्ध दशमी' या दिवसाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्व आहे. देशभरात हा दिवस दसरा किंवा विजयादशमी म्हणून साजरा केला जातो.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटामध्ये देवीची स्थापना केली जाते. या घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवाची सुरुवात होते.नंदादीप प्रज्वलित केला जातो. झेंडूंच्या फुलांची आरास केली जाते. नऊ दिवस आदिमायेची मनोभावे पूजा केली जाते. दुर्गामातेने नऊ दिवस, नऊ रात्र महिषासुर नावाच्या राक्षसाबरोबर घनघोर युद्ध केले. शेवटी म्हणजेच दहाव्या दिवशी रेड्याच्या रुपात असलेल्या महिषासुराचा वध केला.या युद्धात चामुंडा देवीने विजय मिळवला. आणि म्हणूनच या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.हा दिवस दसरा म्हणून साजरा केला जातो.
श्रीरामचंद्रांनी याच दिवशी रावणाच्या बंधनातून सीतादेवीला मुक्त करण्यासाठी रावणाबरोबर तुंबळ युद्ध केले. या युद्धात रामाने रावणाचा वध केला. या दिवशी रामाने दुष्ट प्रवृत्ती रावणावर विजय मिळवला म्हणून हा दिवस 'विजयादशमी' म्हणून साजरा केला जाऊ लागला.
पांडव अज्ञातवासात राहण्यासाठी विराटाच्या घरी गेले होते.त्यावेळी त्यांनी आपली आयुधे जंगलात शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्रे परत घेतली व शमीच्या झाडाची पूजा केली. तो दिवस अश्विन शुद्ध दशमीचा होता.
आज, भारतभरात दसरा साजरा केला जातो. या सणावर वर सांगितलेल्या आख्यायिकांचा प्रभाव दिसून येतो.दसऱ्याच्या दिवशी भारतभर रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते.दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवता येतो असा संदेश नवीन पिढीला यामधून मिळतो.
भारतीय संस्कृतीत दसऱ्याचा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून मानला जातो. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात या दिवसापासून केली जाते. शाळेतील मुले सरस्वतीची म्हणजेच विद्येच्या देवतेची पूजा करतात. मुले पाटीवर सरस्वती चिन्ह काढतात. झेंडूची फुले वाहतात.अगरबत्ती लावतात. नारळ फोडतात.प्रसाद सर्वांना वाटतात.
सर्व शेतकरीही दसरा मनःपूर्वक साजरा करतात. याच दरम्यान शेतकऱ्यांच्या घरी नवीन पीक आलेले असते. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. दसऱ्याच्या दिवशी घरोघरी शेतातल्या भाताच्या, गव्हाच्या लोंब्या तोडून प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ग्रंथ, पोथ्या, शस्रे, हत्यारे यांची पूजा करतात. सर्वजण शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाचे पूजन करतात. नंतर त्याची पाने तोडून 'सोने' म्हणून शेजाऱ्यांना, आप्तांना वाटतात. या परंपरेला 'सोने लुटणे' असे म्हणतात.
दसरा म्हणजे भक्ती आणि पराक्रम यांचे मिलन होय ! विद्या, शौर्य, धन संपादन करण्यास विजय मिळवून देणारा दिवस म्हणजे दसरा ! मानवतेचा अराजकतेवर विजय, सत्याचा असत्यावर विजय म्हणजे विजयादशमी !
याबाबतच्या अधिक माहितीसाठी,नोकरी व रोजगाराच्या संधी, शैक्षणीक घडामोडी, शिष्यवृत्ती सराव, स्पर्धा परीक्षा इत्यादींबाबत जाणून घेण्यासाठी व्हॉट्सॲप समूहात सामील व्हा..
0 Comments