Ticker

6/recent/ticker-posts

मुलांचे ग्रंथालय | मुलांना वाचनाची आवड कशी लावाल |


"Libraries store the energy that fuels the imagination. They open up windows to the world and inspire us to explore and achieve, and contribute to improving our quality of life."Sidney Sheldon


लेखिका- मंजिरी निंबकर

लोकसाधना- चिखलगाव या संस्थेने काही दिवसांपूर्वी  'समृद्ध भाषा समृद्ध मूल' नावाचे तीन दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते.या प्रशिक्षणात या पुस्तकाच्या संपादिका मंजिरी निंबकर या स्वतः व्याख्यान देण्यासाठी उपस्थित होत्या. या व्याख्यानात त्यांनी मुलांचे ग्रंथालय या विषयाला धरून सखोल मार्गदर्शन केले, त्याचप्रमाणे पुस्तकांसोबत घेता येतील असे दोन उपक्रमही घेतले होते. मुलांना वाचनाची आवड कशी लावायची हे समजून घेण्यासाठी शिक्षक व पालक यांच्यासाठी हे पुस्तक महत्वपूर्ण मार्गदर्शकाची भूमिका निभावू शकते, यात शंका नाही. 

मुलांना वाचनाची सवय कशी लावायची ?

खरं, म्हणजे हे एक खूपच छोटेखानी पुस्तक आहे,पण म्हणून कमी महत्वाचे ठरते असे मुळीच नाही. याचं कारण म्हणजे, आजच्या या टीव्ही,मोबाईल, टॅबलेट  ई.गॅजेटच्या युगात मुलांना वाचनाची सवय कशी लावायची हा प्रश्न बहुतेक पालकांना किंबहुना शिक्षकांनाही पडत असतो.आणि याच गहन प्रश्नाचं उत्तर देण्याचा हे पुस्तक प्रयत्न करतं..!

काय आहे पुस्तकात ?

तर पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सांगितल्याप्रमाणे मंजिरी निंबकर या पुस्तकाच्या संपादक आहेत.यामध्ये मंजिरी निंबकर-मुलांचे ग्रंथालय, वाचून दाखवण्याचे फायदे, पुस्तकांनी विस्तारलेले शिक्षण, स्वयंवाचन, हे लेख लिहिले आहेत. याचबरोबर, विद्यादेवी काकडे-ग्रंथालयासाठी पुस्तके व संसाधनांची निवड,प्रो.कृष्ण कुमार-गोष्टी सांगण्याचे महत्व,मधुरा राजवंशी-प्रवासाच्या गोष्टींच्या पुस्तकांच्या प्रवासाची गोष्ट,अमृता धडांबे -घाटपायथ्याची ग्रंथपालनीता इंगळे-पुस्तकांमुळे घडते मूल,सुप्रिया महामुनी-जिवाभावाचे सोबती, या लेखकांचे लेखही या पुस्तकात समाविष्ट आहेत. आणि शेवटी पुस्तकांसोबत घेता येतील असे विविध उपक्रम व खेळ सामील करण्यात आले आहेत.

मुलांच्या बाबतीत पुस्तकांचे महत्व

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याने 2005 मध्ये पुस्तके व ग्रंथालयांचे लहान मुलांच्या आयुष्यातील महत्व अधोरेखित केले. यापूर्वीही पुस्तके महत्वाची मानली जात, परंतु पाठ्यपुस्तकाला पूरक म्हणून, फावल्या वेळात करायचा उद्योग म्हणून.......मुलांना वाचनाची गोडी लागावी,पुस्तकांशी दोस्ती व्हावी, पुस्तकांच्या माध्यमातून जगाशी नाते जोडता यावे, ग्रंथालयाचा व्यापक अर्थ समजावा या संदर्भात ग्रंथपाल, शिक्षक, व पालकांना मार्गदर्शन व्हावे यासाठी या पुस्तिकेचा प्रपंच- मंजिरीताई प्रस्तावनेत नमूद करतात.

ग्रंथालय आणि ग्रंथपाल

ग्रंथालयाची  इमारत मजबूत असावी. ग्रंथालयाला भरपूर खिडक्या असाव्यात.काही खिडक्या तर जवजवळ जमिनीपर्यंत पोचाव्यात.दिवसभर खिडक्या उघड्या असाव्यात.ग्रंथालयात भरपूर उजेड व खेळती हवा हवी. भिंती फिकट रंगाच्या असाव्या.छत पांढरे असावे.

ग्रंथालय आकर्षक असेलच, पण तेथे हसतमुख आणि प्रेमळ असे ग्रंथपाल असतील तर का नाही ते मुलांचे आवडीचे ठिकाण बनणार.

ग्रंथपालाने पुस्तक परत करायला आलेल्या मुलांना पुस्तकाची गोष्ट सांगायला सांगावी किंवा पुस्तक आवडले तर काय व का आवडले व नसल्यास काय व का यावर गप्पा माराव्यात.(पालक आणि शिक्षकही हे करू शकतात)

मुलांना पुस्तकांची ओळख व्हावी यासाठी वेळोवेळी पुस्तक प्रदर्शन भरवावे.मुलांच्या आवडी-निवडी, विचार-कल्पना जाणून घेण्यासाठी मुलांशी सतत संवाद साधावा.ग्रंथपालाला पुस्तकांबद्दल व मुलांबद्दल जिव्हाळा असायला हवा.

मुलांना गोष्टी वाचून दाखवा

गोष्टींमुळे लक्षपूर्वक ऐकण्याचे कौशल्य प्राप्त होते. गोष्टींमुळे अंदाज बांधण्याचे शिक्षण मिळते. अंदाज बांधण्याचे हे कौशल्य गणित शिकण्यासाठी तर अर्थातच अत्यंत उपयुक्त ठरते. गोष्ट ऐकल्याने आपल्या या जगाचा विस्तार होतो.अक्षरओळख नसलेले मूलसुद्धा गोष्टी ऐकून त्यातील पात्रांमार्फत त्याच्या स्वतःच्या दैनंदिन जगापेक्षा विस्तारलेल्या जगाचे हिस्सेदार बनते. गोष्टी शब्दांना अर्थ प्रदान करतात आणि गोष्टींमुळे मुलांचा शब्दसंग्रहही वाढतो.एकूणच साक्षरतेची कौशल्ये सध्या होण्यासाठी  कथाकथन फारच उपयुक्त ठरते.वाचून दाखविण्यासाठी इयत्तेचे किंवा वयाचे बंधन नाही.आपल्या रोजच्या बोलण्यापेक्षा पुस्तकांमधून मुले काहीतरी जास्त नवनवीन शब्द शिकू शकतात. ज्यांना नेहमी वाचून दाखवले जाते ती मुले एखाद्या वाक्यातील पुढील शब्द काय असेल याचा आडाखा बांधू शकतात.पुढेपुढे वाचनाचा वेग वाढण्यासाठी या कौशल्याचा उपयोग होतो.

स्वयंवाचनाची गोडी

वास्तविक शिक्षणाने मुले विचारी व सर्जनशील व्हावीत, आपले विचार ,मते, भावना, कल्पना, मांडायला शिकावीत,त्यांना विविध प्रकारच्या लेखनाचा आस्वाद घेता यावा; हे साध्य करण्यासाठी शिक्षकांनी पाठाबाहेर जायलाच हवे.स्वयंवाचन-प्रकट वाचनाप्रमाणेच स्वयंवाचन हेही एक कौशल्य असून जेवढे स्वयंवाचन अधिक तितके त्यात अधिक प्राविण्य प्राप्त होते. आठवड्याला किमान 2 तास तरी वाचन झाले तरच मुलांना स्वयंवाचनाची गोडी लागते.आणि एकदा अशी गोडी लागली की मुले आयुष्यभरासाठी 'वाचती' होतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


कोणते खेळ व उपक्रम उपयुक्त

पुस्तकाच्या शेवटी एकूण 30 उपक्रम / खेळ दिलेले आहेत.ते सर्वच छान आहेत. मला आवडलेला एक उपक्रम मी येथे देत आहे.

उपक्रम- मुखपृष्ठ तयार करणे:

यामध्ये, सुरुवातीला मुलांना मुखपृष्ठ म्हणजे काय, त्यात काय काय असते, चित्र कोणत्या बाबींचा विचार करून काढलेले असते,हे सांगायचे आहे. त्यानंतर वेगवेगळे पुस्तक व मुखपृष्ठ दाखवायचे आहेत.यानंतर वर्तमानपत्राचे कव्हर घातलेले एक पुस्तक घेऊन सांगावे, मी तुम्हांला आज एक बिनमुखपृष्ठाचे पुस्तक वाचून दाखवणार आहे. ही गोष्ट वाचून झाल्यावर तुम्ही त्याचे मुखपृष्ठ तयार करायचे आहे.शेवटी सर्व मुखपृष्ठांचे प्रदर्शन भरवावे.अतिशय मजेशीर असा हा उपक्रम आहे.

                 तर, सर्वांनीच आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.ग्रंथालये ही शाळेची आत्मा बनली पाहिजेत- असं म्हटलं जातं.पण ती कशी बनतील याचा मार्ग हे पुस्तक दाखवते. मुलांना वाचनाची आवड कशी लावावी या प्रश्नाचे उत्तर हे पुस्तक नक्कीच देते. मुलं कल्पनेच्या भराऱ्या घेऊ शकतात,स्वतंत्र विचार करू शकतात,प्रश्न विचारु शकतात,भविष्यातील सुजाण नागरिक बनू शकतात........


गरज आहे, पालकांना, शिक्षकांना, ग्रंथपालांना अधिक सक्षमतेने मुलांसमोर येण्याची...! हे पुस्तक त्यांच्यासाठी नक्कीच मार्गदशकाची भूमिका निभावू शकेल..! चला, मुलांना वाचनाची आवड लावूया..!

(अधिक माहितीसाठी खाली कमेंटमध्ये विचारा)

अशाच प्रकारचे महत्वाचे शैक्षणिक अपडेट्स थेट मोबाईलवर (whatsapp)मिळवा..👇

https://chat.whatsapp.com/BDffROfyenP2sZQI93Cijp

अशाच प्रकारचे महत्वाचे शैक्षणिक अपडेट्स थेट फेसबुकवर मिळवा..👇

https://www.facebook.com/groups/379344020177108/?ref=share

या अगोदर प्रसिद्ध झालेले व पुढील शैक्षणिक अपडेट्स थेट टेलिग्रामवर मिळवा👇

https://t.me/schoolcompanion07



                                                       

Post a Comment

2 Comments

  1. Khup chhan mahiti dili,mulanala vachnachi avad kashya prepare lavata yeu shakate he samajale dhanyavad sir.

    ReplyDelete