Ticker

6/recent/ticker-posts

विंचूर्णीचे धडे-होतील तितक्या काळासाठी आणखी काही 'आपली' माणसं जोडायची..!


विंचूर्णीचे धडे-होतील तितक्या काळासाठी आणखी काही 'आपली' माणसं जोडायची..!

काही दिवसांपूर्वीच गौरी यांचं 'तेरुओ आणि कांही दुरपर्यंत' हा लघुकादंबरी संग्रह वाचला होता. ते पुस्तक मनाला खुपच भावल्याने त्यांचं माझ्याकडे उपलब्ध असलेले दुसरं पुस्तक आपसूकच कपाटातून हातात आलं.
               गौरी देशपांडे यांचं वास्तव्याबाबत सांगायचं म्हटलं तर, जास्त परदेशवाऱ्या( नवरा कामानिमित्त परदेशी),पुणे,मुंबई आणि आठ दहा वर्षे सातारा जिल्ह्यातील फलटणजवळील विंचूर्णी या गावात त्या राहिल्या. आता, लेखक आणि कलाकार मंडळी हे नेहमीच थोडेफार विक्षिप्त असतातच, असे जरी आपण मानून चाललो तरी, जिचं आयुष्य नेहमीच पुणे,मुंबईभोवती फिरत राहिलंय अशी व्यक्ती जिथे बहुतेकवेळा दुष्काळ असतो अशा ठिकाणी राहायला का गेली असेल असा आपल्याला उगीचच वाटत राहतं. उगीचंच कारण जिचे आजोबा शिक्षणमहर्षी धोंडो केशव कर्वे, काका 'समाजस्वास्थ्य'कार र. धों. कर्वे, वडील दिनकर कर्वे, आई इरावती कर्वे.. ती वेगळी वाट धरणार नाही तर कोण धरणार??
विंचूर्णी येथील वास्तव्य कसे होते, लेखिकेला विंचूर्णीतुन काय मिळाले, विंचूर्णीला लेखिकेने काय दिले या प्रश्नांचा संवेदनशील लेखिकेने स्वतःच्या मनाशीच घेतलेला धांडोळा म्हणजे हे पुस्तक...
               तर, पहिल्याच प्रकरणाचे नाव ' एकलेपणाची' देऊन गौरीने विंचूर्णीच का या प्रश्नाचे उत्तर देऊन टाकले आहे.आयुष्यात आतापर्यंत मी जरी खुप भ्रमंती केली असली तरी मला एकलेपणाच आवडतो अशी स्वतःच्याच मनाला कबुली त्यांनी या प्रकरणात- असे म्हणून दिली आहे-
             एकलेपणाची आस लागली हृदया
              अन दाट पसरली प्रसन्नतेची छाया!

              यानंतर,विंचूर्णीचे विंचू,बॉन्स बिलबॉंग,झाडझाडोरा, 'मायोर्का, मात्सा आणि इतर', गोरखची गोष्ट, नाणींची नवलकथा, मुकुल डोळस, बी-बाय, भाजी-भाकरी-भात, बत्ती, जाता-येता, विंचूर्णीचे धडे, उपसंहार अशी प्रकरणे या पुस्तकात आहेत.
           वरवर, पाहता लेखिकेला तेथील वास्तव्यादरम्यान आलेले अनुभव, विंचूर्णीचं वर्णन, त्यांचे शेजारी, घरी,शेतात काम करणारे नोकर, प्रवासातील काही गोष्टी, यांचं काहीसं हलक्याफुलक्या पद्धतीने केलेले वर्णन म्हणजे हे पुस्तक असे कोणालाही वाटणं सहज शक्य आहे. ते खरेही आहे पण लेखिका एव्हढ्यावरच थांबत नाही हे आपल्याला आतून कुठेतरी जाणवत राहतं. गौरीसारखी संवेदनशील लेखिका जेव्हा हे वर्णन करते तेव्हा ते फक्त 'वर्णन' राहत नाही.
               ग्रामीण भाग आणि शहरी भाग अशी तुलना ओघानेच येते.ग्रामीण भागावर निसर्ग, आणि सरकार दोघेही अन्याय करतात, दुष्काळ जरी असला तरी विंचूर्णीतील लोकं हातावर हात देऊन पुढच्या वर्षाची वाट पाहत राहतात, कोणत्याही उपाययोजना करत नाहीत,याची खंत लेखिकेला वाटते.लेखिका आपल्या परिघातल्या लोकांना बचतीचे, स्वच्छतेचे महत्वही पटवून देताना आपल्याला दिसते, पण हे सर्व प्रयत्नही तोकडेच आहेत, याची स्पष्ट जाणीवही तिला आहे. म्हणूनच 'विंचूर्णीचे धडे'या प्रकरणात ती सांगते;मी पहिला धडा कोणता शिकले- आपल्या हातून कुणाचेही फारसे भले होणार नाही, हा तो धडा. ' काही मूलभूत दृष्टीनेच संघटना, या organisational aparation या अर्थी निराशाजनक असतात.-धडा दुसरा. माणसांना माया लावली, त्यांच्यावर प्रेम केले, त्यांच्याशी मोकळ्या-सरळ मनाने वागले, त्यांची सुखदुःख वाटून घेतली की ती 'आपली' होतात अशी माझी समजूत, जी चुकीची होती-धडा तिसरा. तीन धडे आपण वाचून काढतो, आता, आपणही एका निराशेच्या गर्तेत अडकून जातोय, असे वाटायला लागते, लेखिकेबद्दल अनामिक सहानुभूती वाटायला लागते, आणि काय आश्चर्य लेखिका शेवटचा आणि महत्वाचा धडा सांगायला लागते. ती म्हणते, विंचूर्णीने शिकवलेला सर्वांत महत्वाचा धडा: आयुष्याचे 'तत्वज्ञान'  होऊ द्यायचे नाही.त्याच्याकडून काय किंवा त्याच्यातल्या माणसांकडून काय, अशा बांधील, आखीव, मोठ्या अपेक्षा करायच्या नाहीत........होतील तितक्या काळासाठी आणखी काही          ' आपली' माणसे जोडायची.
                अशाप्रकारे, पुस्तक वाचून केव्हा संपते हे आपल्याला समजतही नाही.यांत लेखिकेने काही विनोद केले आहे, ते वाचून आपल्या ओठावर स्मितहास्य आल्याशिवाय राहत नाही.आता हेच बघा, विंचूर्णीचं नाव नकाशात कुठेही नाही हे सांगून त्या म्हणतात- ...मला ते एकदाच,सात, आठ वर्षांपूर्वी, फलटणच्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेत, त्या वेळच्या मॅनेजरने हाताने काढलेल्या, त्याच्या खोलीत लटकलेल्या एका नकाशात आढळले होते.( म्हणून हरखून जाऊन मी तिथे एक ठेव ठेवली!) 
                   आता, या क्षणाला मला राहून राहून विंचूर्णी गावाबद्दल खूपच कुतूहल वाटत आहे. त्या ठिकाणी असलेल्या लेखकेच्या घराला भेट देण्याचीही मला तीव्र इच्छा होत आहे.......बघूया, सध्यातरी lockdown  आहे.😌

  •                             

Post a Comment

1 Comments