Ticker

6/recent/ticker-posts

पथेर पांचाली: जीवन भरभरून जगता यायला हवं, हे सांगणारी, हृदयात कायमची घर करून राहणारी, अविस्मरणीय कलाकृती!

पथेर पांचाली:
जीवन भरभरून जगता यायला हवं, हे सांगणारी, हृदयात कायमची घर करून राहणारी, अविस्मरणीय कलाकृती!
           हे पुस्तक वाचून आज जवळजवळ दोन आठवडे तरी झाले असतील..लिहीन लिहीन म्हटले तरी सुरुवात कुठून करू हे काही केल्या समजत नव्हते. मनावर इतका खोलवर परिणाम केला होता की, दैनंदिन जीवनात व्यस्त असतानाही या पुस्तकातील प्रसंग डोळयांसमोर तरळून जात असत.एखाद्याच्या दैनंदिन जीवनातील साध्या साध्या गोष्टी तितक्याच सहजतेने सांगूनही हे पुस्तक आपल्याला एव्हढे भावविभोर कसे काय करू शकते याचाच मी विचार करत आहे.
             पथेर पांचाली म्हटलं तर, बऱ्याच जणांना याच नावाचा चित्रपट आठवतो.आणि का नाही भारतीय चित्रपट सृष्टीतील तो एक महत्वाचा चित्रपट आहे. ऑस्कर विजेते सत्यजित राय यांचा तो एक नितांतसुंदर असा चित्रपट आहे.चित्रपट पाहण्याची आवड असल्याने ही माहिती माझ्याकडे होती.आणि म्हणून जेव्हा हे पुस्तक दुकानात समोर दिसले तेव्हा मी ते घेण्याचे ठरवले होते.( युट्यूब, इंटरनेटवर बराच शोध घेतल्यानंतरही चित्रपट बघण्यासाठी मिळाला नाही.)
          सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा कालावधी! बंगाल प्रांतांमध्ये एक निश्चण्डीपूर नावाचे गाव असते.हरिहर आणि सर्वजया हे जोडपे.हरिहरची लांबची चुलतबहीन. सर्वजण तिला इंदिराआत्या म्हणायचे.इंदिराआत्याला जवळचे कोणीही नव्हते.म्हणून ती हरिहरच्या घरी वास्तव्याला होती.हरिहर आणि सर्वजयाची दोन गोजिरवाणी मुले-अपू आणि दुर्गा.डोंगर नदी, झाडांनी सजलेला गावाचा परिसर.वेड लावणारी गावाकडची माती!सोबतीला आठराविश्व दारिद्र्य! ह्या व्यक्ती आणि वर उल्लेख केलेल्या बाकीच्या गोष्टी कादंबरीचे गाभाघटक आहेत! निरागस, अवखळ,सतत रानात, नदीवर, या झाडाखालून त्या झाडाखाली फिरणारी अपुची मोठी बहीण दुर्गा,आणि सतत वेगवेगळे प्रश्न पडणारा, आपल्या बहिणीवर अतोनात प्रेम करणारा अपू ,त्यांचे दैनंदिन जीवन, गरिबीमुळे होणारी हालअपेष्टा पाहून खरंतर मनातून आपण उदास व्हायला लागतो. पण त्याचवेळी या मुलांनी शोधलेली प्रश्नांची उत्तरं, त्यांची निरागसता,छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांनी मिळवलेला आनंद,पाहून हे जीवन सुंदर आहे याची आपल्याला खात्री पटते.
              कादंबरीत वेगवेगळ्या प्रसंगाचे  तुकड्या तुकड्यात वर्णन केले आहे,पण त्यामुळे कुठेही परिणाम कमी झाल्याचा जाणवत नाही.वाचतांना आपण इतके एकरूप होऊन जातो की ,जणू आपणही त्या गावातीलच एक आहोत.आपल्याही नकळत आपण दुःखाचा आवंढा गिळतो, आपल्या डोळ्यांच्या कडा ओलावतात.ही कादंबरी जरी अपूच्या अवतीभोवती फिरत असली तरी कादंबरी संपल्यानंतरही अपुची बहीण दुर्गा आपल्याला आठवत राहते.अतिशय गोड, अवखळ असणाऱ्या दुर्गाच्या वाट्याला आलेले जीवन बघून आपले हृदय पिळवटून निघते.
                जीवनाचे इतके कंगोरे एकाच कादंबरीत अनुभवायला भेटणे हीच कादंबरची सर्वात मोठी बाजू आहे.म्हणूनच ही कादंबरी इतक्या वर्षानंतरही अभिजात हा गुण मिरवत आपल्या अत्युच्च स्थानावर अबाधित आहे.मी हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या आयुष्यात कधीही न विसरल्या जाणाऱ्या गोष्टीत या पुस्तकाने स्थान मिळवले आहे असे मला वाटते. अर्थात यासाठी या पुस्तकाचे अनुवादक यांनाही श्रेय द्यायला हवे..मूळ कलाकृतीला जशाच्या तसे ठेवून अतिशय सुंदर अनुवाद त्यांनी केला आहे.
                पथेर म्हणजे पथ (रस्ता), पांचाली म्हणजे गाणे, काहींचा रस्ता सोपा असतो, काहींचा खडतर असतो, काहींचा मध्यम, पण यातील प्रत्येकानेच 'या' रस्त्याचे गाणे ऐकायलाच हवे.आपल्या मनात, हृदयात  हे गाणे कायमचे रुतून बसले नाही तरच नवल!

पथेर पांचाली
लेखक:विभूतीभूषण बॅनर्जी
अनुवाद:प्रसाद ठाकूर
प्रकाशक: रिया पब्लिकेशन



             
     
         

Post a Comment

0 Comments