Ticker

6/recent/ticker-posts

सोशल मीडिया!

                   

 सोशल मीडियाचा योग्य आणि तारतम्याने वापर केला तर ते अखिल मानवजातीला लाभलेले एक वरदान आहे -
याबाबत  केव्हाही, कुणाचेही दुमत नव्हते आणि नाही.सोशल मीडियामुळे आपल्याला नवनवीन माहिती मिळण्यास मदत होतेच मात्र आपले मत मांडण्यासाठी व्यासपीठ व मित्रांशी अनोख्या संवादाचे माध्यम म्हणूनही ते आपल्याला मदत करते.विदयार्थी व तरुण वर्गासाठी तर  सोशल मीडिया चांगलीच लाभदायक ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.एखाद्या विषयावरील अभ्यास, प्रकल्प ,नवीन उद्योग यासाठी ही मंडळी सोशल मीडियाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करत आहे.जगभरात काय वाचले, लिहिले, ऐकले जाते याची माहिती आपल्याला सोशल मीडियातून मिळते.म्हणजेच एका अर्थाने अवघ्या जगभरातील  कला, साहित्य, संगीतातील  घडामोडी आपल्याला सोशल मीडियामुळे समजतात.समविचारी, समवयस्क, समउद्योगी,लोक एकत्र येऊन माहिती,कल्पना, युक्त्या यांचे आदान-प्रदान हाऊ लागले, एव्हढेच नाही तर एका गटातील व्यक्ती आपापल्या घरी बसून एकत्रित चर्चा करू लागले.लोक आपल्या मनातील भावना सोशल मीडियावर व्यक्त करू लागले.सरकार, खाजगी आस्थपना,   आपले निर्णय, सूचना चुटकीसरशी लोकांपर्यंत पोहचू शकतात.एव्हढेच नाही तर लोक सुद्धा आपल्या समस्या, अभिप्राय, सूचना अगदी सरकारपर्यंत पोहचू शकतात.पण नाण्याला जश्या दोन बाजू असतात तशाच प्रकारे सोशल मीडियाची दुसरी बाजूही तितकीच नपेक्षा जास्त महत्वाची आहे.सोशल मीडियाचा अयोग्य, अतिरेकी आणि विध्वंसंक वापर ही ती दुसरी बाजू.काही समाजकंटक सोशल मीडियातुन  अफवा पसरवून दानवी आनंद मिळवतात,पण त्याची किंमत निष्पाप जीवांना चुकवावी लागते.तर काही सुशिक्षित,सुसंस्कारित  लोकं  सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत(ते स्वतः) इतरांना मायेचे, प्रेमाचे,सुविचाराचे,बोधकथेचे डोस (स्वतः न घेताच) पाजत असतात.त्यामुळे आता 'whatsapp alergi' अशा नव्याच आजाराने डोके वर काढल्याचे ऐकिवात आहे.'स्टेटस' हा प्रकार खरं तर आपले मित्र कुठे आहेत?त्यांचं सध्या काय चाललंय? हे समजण्यासाठी आहे -हे बऱ्याच जणांच्या गावीही नसतं.काही दिवसांपूर्वीच या स्टेटसपायी एका शाळकरी मुलाचा त्याच्याच मित्रांनी खून केल्याची बातमी आहे-(एकाने 'किंग'असे स्टेटस ठेवले तर दुसऱ्याने 'बादशहा आम्हीच', असे स्टेटस ठेवले होते.)स्टेटस वरून त्या व्यक्तीबाबत अंदाज जरी येत असला तरी तो नेहमी बरोबरच असेल असे नसते.त्याचप्रमाणे या माध्यमातून फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे.तेव्हा सोशल मीडियाचा वापर करताना डोळे उघडे तर बुद्धी शाबूत ठेवूनच करायला हवा हेच खरे.
                                                     लेखक-पिनेश जाधव

Post a Comment

0 Comments